
15 जानेवारीला जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 553 ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली असून त्या निमित्ताने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. 4 हजार 784 सदस्यपदासाठी 12 हजार 644 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहे.
अमरावती ः येणाऱ्या वर्षात होऊ घातलेल्या जिल्हापरिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालिम समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत सोमवार (ता.4) महत्वाचा दिवस राहणार आहे. दुपारी तीन पर्यंत नामांकन अर्ज मागे घेणाऱ्यांकडे सर्वांच्या नजरा राहणार आहे. अनेकांनी केलेले बंड शांत करण्याचे मोठे आव्हान गटप्रमुखांसमोर उभे आहे. अर्ज माघारीसाठी अनेकांची मनधरणी सुरू असल्याची माहिती आहे.
15 जानेवारीला जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 553 ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली असून त्या निमित्ताने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. 4 हजार 784 सदस्यपदासाठी 12 हजार 644 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहे.
अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
उद्या अर्ज माघारीचा दिवस असल्याने अनेक उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. दुपारी तीन नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर चिन्हांचे वाटप होणार आहे. सध्या कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागातील चहा टपऱ्या, पानठेले, कट्ट्यांवर निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगत आहे.
चिन्हासाठी मारामार
कुठल्याही निवडणुकीत प्रमुख भुमिका असते ती उमेदवाराच्या चिन्हाची. आपल्या आवडीचे तसेच सोयीचे निवडणूक चिन्ह मिळावे, यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले असले तरी प्राधान्यक्रमानुसार निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. अनेकांची यामध्ये निराशा होणार आहे. विविध पालेभाज्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे, संगणकासह कपबशी तसेच अन्य चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे.
पुढील निवडणुकीचे आमिष
पॅनेलमध्ये जागा न मिळाल्याने अनेक नाराजांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केला आहे. पॅनेलसाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या उमेदवारांचे बंड शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेकांना पुढील पंचायत समिती किंवा जिल्हापरिषद निवडणुकीत मदत करण्याचे आश्वासने दिली जात आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ