विकासाच्या मुद्द्यावर सरकार उताणे - विखे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

नागपूर - जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री कसरती करताना लोकांनी पाहिले; पण विकासाच्या मुद्द्यावर मात्र राज्य सरकार उताणे पडले आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

नागपूर - जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री कसरती करताना लोकांनी पाहिले; पण विकासाच्या मुद्द्यावर मात्र राज्य सरकार उताणे पडले आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून (ता. ४) सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक आज विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, की मुख्यमंत्र्यांचे चहापानाचे निमंत्रण मिळाले आहे; परंतु जाण्याचे कोणतेही औचित्य दिसत नाही. असे सांगून मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री योग दिनात व्यग्र असल्याचे चित्र प्रकाशित झाले होते. हा संदर्भ देत विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. पंतप्रधान देशाला फिटनेसचे धडे देत असताना विकासाच्या मुद्द्यांकडे मात्र पार दुर्लक्ष झाले आहे. हे सरकार दळभद्री, खोटारडे व फसवणूक करणारे असून, कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची केवळ फसवणूक केली आहे. सरकारचा कोणताही धाक राहिला नाही. राज्य सरकारच्या मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना काहीही माहिती नसते. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांना पोलिस अटक करतात; परंतु मुख्यमंत्र्यांना माहिती नसते. मग हे सरकार चालवते तरी कोण, असा सवाल विखे पाटील यांनी केला. या वेळी धनंजय मुंडे, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार जोगेंद्र कवाडे उपस्थित होते.

Web Title: Leader of the Opposition Radhakrishna Vikhe Patil press conference