गावपुढाऱ्यांनी प्रचारासाठी थोपटले दंड; 15 हजार उमेदवार रिंगणात; जिल्ह्यात 1,346 सदस्य बिनविरोध

सूरज पाटील 
Wednesday, 6 January 2021

जिल्ह्यात 980 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात येणार होती. आठ हजार 141 सदस्य निवडून द्यायचे होते. त्यापैकी 55 ग्रामपंचायतींत एक हजार 346 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत.

यवतमाळ : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच गावगाड्यातील वातावरण तापले होते. अर्ज छाननी, नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया आटोपताच आता निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. प्रचारासाठी उमेदवारांना आठवडाभराचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे गावातील ग्रामपंचायतीत आपल्याच गटाची सत्ता यावी, यासाठी गावपुढाऱ्यांनी दंड थोपटले आहे.

जिल्ह्यात 980 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात येणार होती. आठ हजार 141 सदस्य निवडून द्यायचे होते. त्यापैकी 55 ग्रामपंचायतींत एक हजार 346 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे सहा हजार 799 सदस्य निवडून द्यायचे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 17 हजार 386 नामांकन प्राप्त झाले होते. त्यापैकी 328 नामांकन अवैध निघाले. 

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

त्यानंतर वैध नामांकनाची संख्या 17 हजार 57 इतकी होती. अखेरच्या दिवशी दोन हजार 409 इच्छुकांनी नामांकन परत घेतले. त्यामुळे 14 हजार 510 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उभे आहेत. (आर्णी, झरी जामणी, दिग्रस या तालुक्‍यांची आकडेवारी बुधवारी (ता.सहा)) दुपारपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक कार्यालयास प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे या तालुक्‍यांतील नामांकन, वैध मत पत्रे, माघार, प्रत्यक्ष उमेदवार या आकडेवारीचा यात समावेश नाही.)

निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी आठवडाभराचा कालावधी मिळत असल्याने गावगाड्यातील वातावरण चांगलेच तापत आहे. एकमेकांविरुद्घ शाब्दिक हल्लेही चढविले जात आहेत. ग्रामपंचायतींवर आपल्याच गटाची सत्ता यावी, यासाठी गावपुढाऱ्यांकडून रणनीती आखली जात आहे. कालपर्यंत एकाच गटात असणारे दूर गेले तर, दुसऱ्या गटातील पुढारी विरोधी गटाला येऊन मिळाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना विकासनिधी देण्याची घोषणा मंत्री, आमदारांनी केली. त्याला 55 गावांतील नागरिकांनी प्रतिसाद दिला. येत्या 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार असल्याने गावगाड्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.

अधिक माहितीसाठी - गाढ झोपेत असताना आला मोठा आवाज, घराबाहेर धाव घेताच दिसलं थरारक दृश्य

तालुकानिहाय बिनविरोध ग्रामपंचायती

यवतमाळ जिल्ह्यात 55 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात गावपुढाऱ्यांना यश आले आहे. पालकमंत्री संजय राठोड व आमदारांनी केलेल्या घोषणेनुसार ग्रामपंचायतींना निधी मिळणार आहे. बाभूळगाव-पाच, दारव्हा-तीन, दिग्रस-दोन, घाटंजी-एक, कळंब-तीन, केळापूर-सहा, महागाव-दोन, मारेगाव-एक, महागाव-दोन, नेर-एक, पुसद-सहा, राळेगाव-एक, उमरेखड-दहा, वणी-आठ, यवतमाळ-एक, झरी जामणी-पाच, आर्णी-0, याप्रमाणे बिनविरोध ग्रामपंचायती आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leaders in Villages are getting ready for Gram Panchayat Elections