पाण्याच्या शोधात तो गावात आला अन्‌ शिकाऱ्याच्या सापळ्यात अडकला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 एप्रिल 2020

शनिवारी सकाळी लोखंडी सापळ्यात बिबट अडकल्याचे कळताच वरिष्ठ वनअधिकाऱ्यांसह त्यांचे पथक खैरी येथील शेतात पोहोचले. पाहणी केली असता एक बिबट लोखंडी सापळ्यात अडकून बेशुद्ध झाल्याचे लक्षात आले.

परतवाडा (जि. अमरावती) : जंगलात बिबट्यासह इतरही वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रकार कमी झाले होते. परंतु अचलपूर तालुक्‍याच्या खैरी गावात शिकारीसाठी टाकलेल्या लोखंडी सापळ्यात बिबट अडकल्याची घटना शनिवारी (ता. 25) उघडकीस आली. 

परतवाडा प्रादेशिक वनपरिक्षेत्रात ही घटना घडल्याने वनविभागाची झोप उडाली. शनिवारी सकाळी लोखंडी सापळ्यात बिबट अडकल्याचे कळताच वरिष्ठ वनअधिकाऱ्यांसह त्यांचे पथक खैरी येथील शेतात पोहोचले. पाहणी केली असता एक बिबट लोखंडी सापळ्यात अडकून बेशुद्ध झाल्याचे लक्षात आले. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. कुणीतरी शिकार करण्यासाठी हा सापळा शेतात ठेवल्याची शक्‍यता वनविभागाचे अधिकारी पडताळून बघत आहेत. परतवाडा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बिबट्याचा मागील पाय ट्रॅपमध्ये अडकला होता, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अवश्य वाचा- वाघाच्या बछड्याने लावली सोशल डिस्टन्सिंगची वाट, कसे ते वाचाच?

बेशुद्ध बिबट्याला नेले रुग्णालयात

तापमान दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जंगलात ज्याठिकाणी पाणवठे सुकलेले आहेत, तेथील वन्यप्राणी पाण्याच्या शोधासाठी रात्रीच भटकत मानवी वस्तीपर्यंत येतात. हा बिबटसुद्धा पाण्याच्या शोधासाठी खैरी गावातील शेतापर्यंत आला असावा. परंतु शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी सापळ्यात अडकल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी बिबट्याने बराच प्रयत्न केला. परंतु त्याला ते शक्‍य झाले नाही. अखेर तो बेशुद्ध पडला. वनविभागाने त्या बेशुद्ध बिबट्याला एका सुरक्षित लोखंडी पिंजऱ्यात ठेवून रुग्णालयात नेले. घटनास्थळी उपवनसंरक्षक शिवबाला, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, डॉ. मिलिंद काळे, डॉ. गजानन महल्ले, श्री. घटारे, वनविभागाच्या रेस्क्‍यू टीमचे अमोल गावनेरसह वनकर्मचारी उपस्थित होते. 

बिबट्याच्या मागील पायातील लोखंडी ट्रॅप काढण्यात आला. बिबट्याचे सर्व अवयव व्यवस्थित असून उपचारासाठी सिपना वन्यजीव विभाग येथे आणण्यात आले आहे. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल. 
- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leapord came in the viillage for water and traped in the cage