आयुष्याचे सोडा राजेहो, मेल्यानंतरही सुटका नाही !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

राज्य शासनाने लाखो रुपये खर्च करून जनतेच्या सुविधेसाठी चिचोली वस्तीत शवविच्छेदनगृहाच्या इमारतीचे बांधकाम केले. मात्र, अनेक वर्षांपासून बांधकाम करण्यात आलेली इमारत बेवारस झाली आहे. इमारत झाडीझुडपांनी वेढली आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात बुडाले आहेत. शवविच्छेदनगृहाची दयनीय अवस्था झाली.

नागपूर ः आयुष्यात मनाला बोचणाऱ्या असंख्य शल्यांनी होरपळून सोडले असताना मृत्यूनंतरही मृत शरीराची गैरसोय होणेही संपत नाही, ही शोकांतिका आहे. जिल्ह्यातील अनेक शवविच्छेदनगृहाची अवस्था अतिशय वाईट आहे. काही ठिकाणी इमारतीत अपुरी जागा, काही ठिकाणी रस्त्यांचा अभाव तर काही ठिकाणी डॉक्‍टरांची कमतरता व इतर सुविधांची ऐसीतैसी झाल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणच्या बातमीदारांनी जिल्ह्यातील शवविच्छेदनगृहाचे पोष्टमार्टम केल्यानंतर ही परिस्थिती उघड झाली.

चिचोलीतील इमारत बेवारस
राज्य शासनाने लाखो रुपये खर्च करून जनतेच्या सुविधेसाठी चिचोली वस्तीत शवविच्छेदनगृहाच्या इमारतीचे बांधकाम केले. मात्र, अनेक वर्षांपासून बांधकाम करण्यात आलेली इमारत बेवारस झाली आहे. इमारत झाडीझुडपांनी वेढली आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात बुडाले आहेत. शवविच्छेदनगृहाची दयनीय अवस्था झाली. मुख्य महामार्ग (हायवे) हा जवळच असून, खापरखेडा-दहेगाव रंगारी मार्गसुद्धा चौपदरी झाला आहे. याप्रसंगी दहेगाव रंगारी ते खापरखेडा व खापरखेडा ते कामठी, नागपूर मुख्य मार्ग हा लहान-मोठ्या वाहनांसह या मार्गाने जडवाहनेसुद्धा धावतात. चोवीस तास वर्दळीचा मार्ग असल्याने रोज अपघातात अनेक निष्पापांचा बळीसुद्धा गेला आहे. परिसरात कुठलीही पोलिस केस झाली तर पोस्टमार्टम खापरखेड्यातच व्हावे व नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च करून शवविच्छेदनगृहाचे बांधकाम केले. मात्र, ती इमारत बेवारस झाली आहे. या शवविच्छेदनगृहाचे दरवाजे, खिडक्‍या, बांधकामात वापरण्यात आलेल्या विटासुद्धा चोरट्यांनी नेऊन हे शवविच्छेदनगृह असामाजिक तत्त्वांचे आश्रयस्थान झाल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.
.
मनधरणी करून कर्मचारी आणले जातात

वेलतूर ः येथील शवविच्छेदनगृह डॉक्‍टर व सफाई कर्मचाऱ्यांअभावी शोभेची वास्तू ठरले आहे. मोठा गाजावाजा करीत सुरू झालेली ही वास्तू सध्यातरी निरुपयोगी ठरत आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस ठाणे असतानाही गरजूंना कुही, नागपूर वा इतरत्र शवविच्छेदन करावे लागते. त्यामुळे मृताच्या नातेवाइकांना अनेक समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कर्मचारी चार वर्षांपूर्वी बदली होऊन गेला. त्या ठिकाणी अजूनही नवा कर्मचारी आला नसल्याने शवविच्छेदनगृह वेलतूरकरांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. गरज पडल्यास तालुक्‍यातील कुहीच्या रुग्णालयातला सफाई कर्मचारी विनंती व त्याची मनधरणी करून येथे पाचारण करण्यात येतो.

कुठली, कशाचीच व्यवस्था नाही
नरखेड तालुक्‍यात दोन पोलिस ठाणी व दोन शवविच्छेदन गृह आहेत. यात एक जलालखेडा येथे आहे. जलालखेडा पोलिस ठाण्यांतर्गत 65 गावे येतात. या गावात आत्महत्या असो, अपघातात मरणे असो किंवा अन्य कारणाने मारणे असो, या सर्व मृतदेहाचे विच्छेदन जलालखेडा येथील शवविच्छेदनगृहात केले जाते. पण, या ठिकाणी सहा कर्मचारी असल्यामुळे सफाई कर्मचाऱ्याला काटोल येथून बोलविण्यात येते. वैद्यकीय अधिकारी यांचीदेखील व्यवस्था करावी लागते. ते येईपर्यंत मात्र नातेवाइकांना ताटकळत या शवविच्छेदनगृहाबाहेर बसावे लागते. येथे कशाची व्यवस्था नाही. तसेच शवविच्छेदनगृह हे नादुरुस्त असून याची दुरुस्ती होणे आवश्‍यक आहे.

सर्वसामान्य गरीब माणसाच्या दुर्दैवी घटनेतील मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे असल्यास भाड्याने गाडी करून शवविच्छेदनासाठी नागपूर येथे हलविण्यात येते. या वेळी परिवारातील सदस्याला आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास सोसावा लागतो. त्यामुळे खापरखेड्यात शवविच्छेदनगृहाची अत्यंत गरज आहे.
-सागर पाठराबे
नागरिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leave life, even after death!