
यवतमाळ : जिल्ह्यातील एक हजार दोनशे ग्रामपंचायतींंपैकी एक हजार ४४ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाचे आरक्षण गेल्या मार्च महिण्यात काढण्यात आले होते. त्यातील ९८० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. असे असले तरी पूर्वी काढण्यात आलेले सरपंचपदाचे आरक्षण ग्रामविकास विभागाने रद्द केलेले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात निवडणुकीनंतरच गावपुढारी ठरणार आहेत.
ग्रामपंचायतींच्या राजकारणाचा उलटफेर करणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतरच आता सरपंचपदांची आरक्षण सोडत पूर्ण केली जाणार आहे. ज्या जिल्ह्यांत निवडणुकीआधीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालेले होते, तेही या नव्या निर्णयामुळे रद्द करण्यात आलेले आहे. ग्रामविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपूर्वीची सरपंचपदाची सोडत जाहीर होत होती. परंतु, सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार व खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढविण्याचे प्रकार वाढल्यामुळेच नवा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार आहे. १५ जानेवारीला मतदान व १८ जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे.
विशेष म्हणजे आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे प्रमाणपत्र नसल्यास ते विहित कालावधीत सादर करण्याचे हमीपत्र देणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर जातप्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती नामनिर्देशनपत्राबरोबर जोडावी लागणार आहे.
दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रतीक्षा लागलेली होती. ही प्रतीक्षा आता संपुष्टात आली असली तरी सरपंचपदाचे बाशिंग बांधून बसलेल्यांना मोठा धक्का बसला आहे.
मार्च ते एप्रिल या महिन्यांत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास चारशेहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक गेल्या मार्च महिन्यांतच होणार होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. ऑगस्ट ते सप्टेंबर व ऑक्टोबर ते डिसेंबर यादरम्यान ग्रामपंचातींची मुदत संपुष्टात आली होती. या काळातील सर्वच ९८० ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे.
ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण आधीच निघालेले होते. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होताच भावी सरपंचांचे स्वप्न अनेकांना पडायला सुरुवात झाली होती. अनेकांनी त्यादृष्टीने तयारीही केली. भेटीगाठी घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, आता ग्रामविकास विभागाने नवीन आदेश काढून जाहीर झालेले आरक्षण प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे आता भावी सरपंच म्हणून तयारी करणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.