esakal | थरारक : भरदिवसा गावात घुसला बिबट अन् बिथरलेल्या बिबट्याने समोर दिसेल त्याच्यावर...
sakal

बोलून बातमी शोधा

leopard in buldana district.jpg

गावातून युवक व नागरिकांनी चारही बाजूने नाल्याकडे धाव घेतल्याने बिथरलेल्या बिबट्याने समोर दिसेल त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केले.

थरारक : भरदिवसा गावात घुसला बिबट अन् बिथरलेल्या बिबट्याने समोर दिसेल त्याच्यावर...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जानेफळ/घाटबोरी (जि.बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील मोळा येथे भरदिवसा गावालगतच्या नाल्यामध्ये बिबट्याने गावातील चार व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून जखमी केले. जखमी चौघेही गावकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परतले आहे. गावालगत आलेल्या बिबट्याला गावातील युवक व नागरिक हुसकावून लावित असताना यावेळी बिथरलेल्या बिबट्याने चौघांवर हल्ला चढवीत गंभीर जखमी केल्याची घटना मेहकर तालुक्यातील मोळा येथे आज (ता.6) सायंकाळी 6 वाजे दरम्यान घडली आहे.

मोळी शिवारातून मोळा गावाला लागूनच असलेल्या नाल्यात बिबट्या उतरल्याचे पाहून शेजारीच शेतात काम करीत असलेल्या मजूर महिला व पुरुषांनी एकच आरडाओरड केली. मोळा गावालगतच्या नाल्यांमध्ये गावकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होताच गावात शिरू नये यासाठी गावातील लोकांनी त्याला हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी गावातून युवक व नागरिकांनी चारही बाजूने नाल्याकडे धाव घेतल्याने बिथरलेल्या बिबट्याने समोर दिसेल त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केले. 

महत्त्वाची बातमी - लेव्हल क्रॉसिंग डे : फरक तर पडतोच भाऊ! रेल्वे क्रॉसिंग ओलांडतांना येथे गेले शेकडो जीव

यामध्ये मधुकर वानखेडे यांच्या कानाला व दंडाला, दत्ता वानखेडे पाठीवर व तोंडावर, प्रफुल वानखेडे पाठी मागील भागात व निखील धोटे यांच्या डोक्यावर दाताने व नखाने प्राणघातक हल्ला करून जखमी केले. यात गीताबाई कड रा.मोळी रा.मेहकर ही महिला सुध्दा गंभीर जखमी झाले आहे. तर इतर तिघे किरकोळ जखमी झाले आहे. 

परंतु, त्यांची नावे कळू शकलेली नाही. उपस्थित जनसमूहाच्या कल्लोळाने त्यांचे प्राण वाचले. सदर बिबट्याने लावणा शिवाकडे पळ काढला. सर्व जखमींना उपचारार्थ मेहकर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी तोंडीलायला यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

loading image