कुष्ठरुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय

Leprosy
Leprosy

भंडारा - कुष्ठरोग हा उपचाराअंती पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. परंतु, आजही अज्ञान, गैरसमज वा भीतीमुळे रोग लपवून ठेवण्याची प्रवृत्ती कमी झालेली नाही. जिल्ह्यात हा रोग सातत्याने बळावत चालला आहे.

२०१७-२०१८ मध्ये तब्बल ४९० रुग्ण आढळून आलेत. पुन्हा एप्रिल ते ऑगस्टपर्यंत पाच महिन्यांत १५७ रुग्णांची त्यात भर पडल्याचे दिसून येते. 
कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी मोफत उपचार सुविधा, रुग्णांचे पुनर्वसन यासाठी शासन विशेषत्वाने प्रयत्नशील आहे. तरीही दरवर्षी नवीन रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक असल्याचे दिसते. 

२०१३ ते २०१८ या पाच वर्षांच्या काळात तब्बल २ हजार ८०८ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले. दरम्यान, योग्य उपचाराअंती जुने व नवीन रुग्ण पकडून २ हजार ८८२ रुग्णांची या आजारातून मुक्तता झाली. विशेष म्हणजे नवीन रुग्णांमध्ये महिला व लहान बालकांचे प्रमाण लक्षणीय आहे. घरातील मोठ्या व्यक्तींच्या दुराग्रहामुळे लहान मुलांनासुद्धा या आजाराची झळ बसल्याचे दिसते. तसेच या कुष्ठरुग्णांपैकी निम्मे रुग्ण सांसर्गिक कुष्ठरुग्णांच्या श्रेणीत मोडत असल्याने आजार लपवून ठेवल्यामुळे ही स्थिती उद्‌भवत असल्याचे आढळले आहे. 

औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. परंतु, वेळीच उपचार न घेतल्यास धोका वाढतो. अपूर्ण उपचार केल्यास हातपाय लुळे पडणे, हातापायाची बोटे वाकडी होऊन विकृती येते. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत विकृती आलेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 

जिल्ह्यातील लाखांदूर, मोहाडी, साकोली, लाखनी या तालुक्‍यांमध्ये दरवर्षी नवीन कुष्ठरुग्ण आढळून येतात.

या मोहिमेचे उद्दिष्ट समाजाततील कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बरे करणे तसेच कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने प्रयत्न करणे आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या तपासणी पथकास सहकार्य करून घरातील सर्व सदस्यांची तपासणी करून घ्यावी.
- डॉ. नितीन वानखेडे, सहायक संचालक, आरोग्यसेवा (कुष्ठरोग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com