कोरोनाला पळवून चांगले दिवस येऊ दे! ईदनिमित्त केली मुस्लिम बांधवांनी प्रार्थना 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

30 दिवसांच्या रोजानंतर (उपवास) 30 व्या रोजाला आकाशात चंद्रदर्शन 
होताच पवित्र रमजान महिन्याची सांगता ईद-उल-फीतर म्हणजे रमजान ईदने करण्यात आली.

दिग्रस (जि. यवतमाळ) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे सर्वच जाती-धर्माची धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली. त्यामुळे सोमवारी (ता.25) मुस्लिम बांधवांनी मशीद, इदगाहवर न जाता घरीच नमाज अदा करून पवित्र रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात केली. संपूर्ण जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोना महामारीचा नायनाट होऊन पुन्हा चांगले दिवस येऊ दे, अशी प्रार्थना यावेळी अल्लाहकडे करण्यात आली. 

30 दिवसांच्या रोजानंतर (उपवास) 30 व्या रोजाला आकाशात चंद्रदर्शन 
होताच पवित्र रमजान महिन्याची सांगता ईद-उल-फीतर म्हणजे रमजान ईदने करण्यात आली. कोरोनाच्या थैमानामुळे मागील दोन महिन्यांपासून सर्व धार्मिकस्थळ बंद असल्यामुळे प्रथमच रमजान ईदला मशीद व इदगाहवर सामसुम दिसत होती. सकाळपासूनच मुस्लिम बांधवांच्या घरी रमजान ईदनिमित्त आनंदाचे वातावरण दिसत होते. चिमुकल्यांसह परिवारातील सर्व सदस्यांनी नवीन कपडे घालून घरातच नमाज पठण करून एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच खीरखुरमा खायला दिला. 

पुन्हा चांगले दिवस येण्याकरिता प्रार्थना 

कोरोनाप्रति खबरदारीचा उपाय म्हणून मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा केली. या प्रसंगी सर्व मुस्लिम बांधवांनी लवकरात लवकर कोरोनाचा नायनाट होऊन पुन्हा चांगले दिवस येऊ दे, अशी प्रार्थना अल्लाहकडे केल्याचे प्रा. मतीन खान म्हणाले. 

प्रशासनाच्या आवाहनाला सहकार्य 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुस्लिम बांधवांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करून कोणत्याही इफ्तार पार्टीचे आयोजन न करता रमजान महिना साजरा केला. रमजान ईदची नमाज सुद्धा घरीच पठण करून प्रशासनाला सहकार्य केले, असे मत तहसीलदार राजेश वजिरे यांनी व्यक्त केले. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let the good days come! Prayers offered by the Muslim brothers on account of Ramjan Eid