'त्यांना' समाजाचा घटक बनवू या : डॉ. उपाध्याय 

'त्यांना' समाजाचा घटक बनवू या : डॉ. उपाध्याय 

नागपूर : भविष्यात होणाऱ्या शिक्षेचा किंवा परिणामाचा विचार न करता क्षणिक रागातून घडलेल्या गुन्ह्यातील विधीसंघर्षग्रस्तांना (बाल आरोपींना) पुन्हा सामाजिक घटक बनविण्यासाठी तसेच त्यांचे संरक्षण करण्यासाठी नागपूर पोलिस कटिबद्ध आहेत. भविष्यात याच मुलांमधून शासकीय अधिकारी, पोलिस किंवा मोठे उद्योजक घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आज त्यांच्या चुका माफ करून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी "केअर' नावाने केंद्र तयार करण्यात आले, असे प्रतिपादन पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले. ते आज छावणीतील पटेल बंगला येथील केंद्राच्या उद्‌घाटनावेळी बोलत होते. यावेळी बाल न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती बेदरकर, सहआयुक्‍त रविंद्र कदम उपस्थित होते. 

डॉ. उपाध्याय म्हणाले, एखाद्या मुलाच्या हातून नकळत-अजाणतेने गुन्हा घडला तर त्याच्याकडे आरोपी म्हणून पाहता येणार नाही. त्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत आहे, याचा अभ्यास केला तर मुलांमध्ये गुन्हेगारीची भावना निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणारी कृप्रवृत्ती नष्ट करण्याची गरज आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्या मुलांमध्येसुद्धा बालपण लपलेला साधारण मुलगा दिसू शकतो. चांगले विचार आत्मसात करा, शिक्षण घ्या आणि अभ्यास करा. शारीरिक विकासासाठी खेळाकडे वळा. तुमच्या अज्ञानाचा कुणी फायदा घेऊ देऊ नका, भविष्यातील धोके ओळखून पोलिसांना मित्र बनवा, असा सल्लाही यावेळी डॉ. उपाध्याय यांनी दिला. कार्यक्रमाची प्रस्तावना पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम यांनी केले. 

झोन फोर बाल आरोपींसाठी "हॉट' 

शहरात गेल्या दोन वर्षात 514 बाल आरोपींची नोंद आहे. यापैकी 65 बालकांनी नुकताच वयाची 18 वर्षे पूर्ण केली. 42 बालके वारंवार गुन्हे करणारी असल्याचे आढळले. सर्वाधिक बालआरोपी झोन फोनमध्ये आहेत. त्यांची संख्या 88 असून झोन पाचमध्ये 86, झोन एकमध्ये 82, झोन दोनमध्ये 59 आणि झोन तीनमध्ये 60 बालकांचा समावेश आहे. 

बलात्काराच्या गुन्ह्यात 25 मुले 

जवळपास दीडशेवर मुलांचा समावेश गंभीर गुन्ह्यातील आरोपांमध्ये आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात तब्बल 25 मुले आहेत. मुलींशी अश्‍लिल चाळे करणाऱ्यांची संख्या 7 तर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्यांमध्ये 9 मुलांचा समावेश आहे. हत्याकांडात 24 जण तर खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात 14 मुलांचा समावेश आहे. चोरीच्या गुन्ह्यात 111 मुले तर घरफोडीच्या गुन्ह्यात 50 मुलांचा समावेश आहे. 

काय मिळेल केअर केंद्रात ! 

बाल न्यायालयात खटले सुरू असलेल्या मुलांना शिक्षण, प्रशिक्षण, खेळ आणि सुधारात्मक पद्धती केअर केंद्रात उपलब्ध आहे. महिन्यातून दोन वेळा मुलांना एकत्र बोलाविण्यात येईल. त्यांचे समूपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात येईल. शिक्षणाकडे वळविण्यात येईल तसेच भविष्यात जबाबदार नागरिक बनविण्याकडे कल असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com