भीषण आग! पाच जनावरे आणि चार घरे जळून खाक, दोन दिवसातली दुसरी घटना

aag
aag

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : तालुक्यातील मु-हादेवी येथे लागलेल्या आगीत पाच घरे जळून खाक झाली असून गोठ्यात बांधलेली पाच जनावरे ठार झाली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.   
दोन दिवसांआधी निमखेड बाजार येथे लागलेल्या आगीचे वृत्त थंड होत नाही तोच बुधवारी (ता. २७) मु-हादेवी येथे दुपारी दीड वाजता मोठी आग लागली. अ. सलीम शे. नजीर, शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर या चौघांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीत जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. आगीत अ. सलीम शे. नजीर यांचे दोन बैल जागीच मरण पावले, तर एक बैल पूर्णतः भाजल्या गेला. आग एवढी भयंकर होती की गोठ्यातील जनावरे वाचविण्याचा वेळसुद्धा गावक-यांना मिळाला नाही. अग्नीतांडवात एक म्हैस, एक बोकडसुद्धा जळाला. शे. सलीम यांचे या जनावरांसह जीवनोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. आठवड्या अगोदरच सलीम यांनी ७५ हजार रुपयांची बैलजोडी, तर ६० हजार रुपयांची म्हैस घरातील सर्व पुंजी खर्चून विकत आणली होती. त्यामुळे सलीम यांचा संसारच उघड्यावर आला आहे. गोठ्याला आग लागल्यानंतर जनावरांना सोडण्यासाठी गेलेले अ. सलीम हेसुद्धा गंभीररीत्या भाजल्याने जखमी झाले. शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांच्याही घरातील जीवनावश्यक साहित्यासह शेतीपयोगी साहित्य जळाल्याने या सर्वांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर अतुल पखान यांचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले.
आग लागल्याचे लक्षात येताच गावक-यांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात येत नव्हती. अंजनगावसुर्जी येथील अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याने दर्यापूर, अचलपूर, अकोट येथील अग्निशमन वाहने तत्काळ  पोहोचली व त्यांनी आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून महसूल प्रशासन पंचनामा करीत आहे.  तहसीलदार विश्वनाथ घुगे, चिंचोली रहिमापूरचे ठाणेदार जमील शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी गावक-यांनी केली आहे. आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नाही.
दरम्यान, घरांना आग लागल्याची माहिती मिळताच आमदार बळवंत वानखडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत नागरिकांचे सांत्वन केले. तसेच नुकसानभरपाई तातडीने मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

सविस्तर वाचा - सामूहिक चाचणीचा निर्णय राज्याने घ्यावा
अंजनगावचे अग्निशमन पुन्हा नापास
तालुक्यात आग लागण्याची मालिका सुरूच आहे. नागरिक अंजनगाव न. प. अग्निशमनला  फोन लावतात. परंतु आमची गाडी नादुरुस्त आहे, असे ठरावीक उत्तर मिळते. दर्यापूरला फोन लावा, असेही सांगितले जाते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत असून, गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनाचा नाकर्तेपणा सिद्ध होत आहे. अंजनगाव नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन आज परत एकदा नापास झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com