दारूबंदीनंतर ताडोबाकडे विदेशी पर्यटकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाकडे विदेशी पर्यटकांनी पाठ फिरविल्याची माहिती पुढे आली आहे. दारूबंदी होण्यापूर्वी एका वर्षात आठ हजारांपेक्षा अधिक विदेशी पर्यटकांनी प्रकल्पाला भेट दिली होती. दारूबंदीनंतर हा आलेख सतत घसरत असून, गेल्या दोन वर्षांत 60 टक्के पर्यटक घटले आहेत. यामुळे स्थानिक गाइड, रिसॉर्ट संचालक आणि जिप्सी चालकांना आर्थिक फटका बसला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील जैवविविधता आणि नैसर्गिकरीत्या समृद्ध असल्याने राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. यामुळेच या व्याघ्रप्रकल्पाला येणाऱ्या वनप्रेमींची संख्या सतत वाढत असली तरी विदेशी पर्यटकांमध्ये घट होत आहे. विदेशी पर्यटकांची घसरती संख्या गाइड, रिसॉर्ट संचालक आणि जिप्सी मालकांच्या चिंतेत वाढ करणारी आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व वन विभागाने "इको टुरिझम'ला चालना देण्याचे प्रयत्न केले. मात्र, गेल्या दोन वर्षांत दारूबंदीनंतर देश-विदेशी पर्यटकांच्या संख्येत सतत घसरण होत आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे मत येथील रिसॉर्ट संचालकांनी व्यक्त केले.

विदेशी पर्यटक
2015-16 - 8 हजार 152
2016-17 - 4 हजार 080
2017-18 - 3 हजार 976

Web Title: liquor ban tadoba tiger project foreign tourist