अमरावतीनंतर आता यवतमाळचीही लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल; हे नियम पाळा अन्यथा कडक निर्बंध 

चेतन देशमुख 
Sunday, 21 February 2021

रविवार (ता.21) मध्यरात्रीपासून बाजारपेठेतील सर्व आस्थापनाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत करण्यात आली. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याची वाटचाल ‘लॉकडाऊन’च्या दिशेने सुरु असल्याचे दिसत आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा एक हजारांच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एक मार्च 2021पर्यत ‘मिशन बिगेन अगेन’अतंर्गत देण्यात आलेली सुट रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाबतचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. रविवार (ता.21) मध्यरात्रीपासून बाजारपेठेतील सर्व आस्थापनाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत करण्यात आली. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याची वाटचाल ‘लॉकडाऊन’च्या दिशेने सुरु असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यवतमाळ, पांढरकवडा तसेच पुसद परिसरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. यानंतर रविवार (ता.21) यात पुन्हा बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी नवे आदेश निर्गमीत केले आहे. त्यानुसार आता सर्व दुकाने,आस्थापनाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत करण्यात आली आहे. 

Breaking: अमरावती आणि अचलपूरमध्ये आठवडाभर कडकडीत बंद; जीवनावश्यक बाबी वगळता सर्व...

आठवडा अखेर शनिवार सायंकाळी पाच ते सोमवार सकाळी सात पर्यंत संचारबंदी राहणार आहे. याकाळात दुग्ध विक्रेते डेअरी दुकाने नऊ ते पाच वेळेत सुरु राहणार आहे. पालिका तसेच नगरपंचायत क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरु ठेवण्याकरीता यापुर्वी परवानगी दिली आहे. ते सर्व उद्योग सुरु राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील आरोग्य, वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, बँका सेवा वगळून इतर शासकीय तसेच खासगी कार्यालयात 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त आहे, 

ती ग्राह्य धरुन सुरु ठेवण्याची मुभा आहे.  धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेह सम्मेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका आदीबंद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी, कोचींग क्लासेस हे बंद राहणार आहे. सिनेमागृहहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाटयगृहे, प्रेक्षकगृहे बंद राहणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्याची वाटचाल ’लॉकडाऊन’च्या दिशेने सुरु असल्याचे दिसत आहे.

हे आहेत नवे आदेश

-दुकाने,आस्थापनची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच.
-पुर्व परवानगी उद्योग राहणार सुरु.
-शाळा,महाविद्यालय,प्रशिक्षण केंद्र, शिकवणी वर्ग, कोचींग क्लासेस बंद.
-उपहागृहे, हॉटेल्स सुरु न ठेवता पार्सल सुविधा.
-उत्तरपत्रिका तपासणे, निकालासाठी शाळा,महाविद्यालयतील कर्मचार्‍यांना परवागनी.
-50 टक्के प्रवाशी क्षमतेने आंतरजिल्हा वाहतुक.
-धार्मीकस्थळी दहा व्यक्तीना एकावेळी परवागनी.
-ठोक भाजीमंडई वेळ सकाळी तीन ते सहापर्यंत.
-मॉनिगवॉक,व्यायामाला सकाळी आठ वाजेपर्यंत सुट.

लग्नसंमारसभासाठी 25 व्यक्तींना परवानगी

लग्न समारंभ खुले लॉन, मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 25 व्यक्तींच्या मर्यादेत संख्या ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. यासाठी तहसिलदाराकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. 

कौतुकास्पद! वैद्यकीय सेवा 'त्या' चिमुकल्यासाठी ठरली देवदूत; शर्थीचे प्रयत्न करून वाचवला...

प्रतिबंधित भागासाठी तीनपर्यंत वेळ

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या परिसरात जीवनाश्यक वस्तू, औषधी यांची वेळ सकाळी आठ ते दुपारी तीन वाजतापर्यंत सुरू राहणार आहे. इतर बिगर जीवनावश्यक वस्तूची दुकाने बंद राहतील. सर्व धार्मिकस्थळे पूर्णपणे बंद राहतील.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown may announced in Yavatmal also