Breaking: अमरावती आणि अचलपूरमध्ये आठवडाभर कडकडीत बंद; जीवनावश्यक बाबी वगळता सर्व राहणार बंद 

8 days lockdown in Amravati and Achalpur due to corona
8 days lockdown in Amravati and Achalpur due to corona

अमरावती : मुंबईनंतर कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणा-या अमरावती तसेच अचलपूर शहरामध्ये एका आठवड्यासाठी कडकडीत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी (ता.२२) रात्री आठपासून लॉकडाउन सुरू होणार असून एक आठवडाभर जीवनावश्यक बाबी वगळता सर्व प्रतिष्ठाने, व्यापार, व्यवसाय, लग्नसमारंभ बंद राहणार आहेत.

वारंवार आवाहन करूनसुद्धा अमरावतीकरांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने नाइलाजास्तव लॉकडाउनचा निर्णय जाहीर करावा लागला, असे पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. यासंदर्भात त्यांनी रविवारी (ता.२१) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या उच्चाधिका-यांची बैठक घेतली व त्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला.

पालकमंत्री म्हणाल्या, अमरावती तसेच अचलपूरमध्ये सर्वाधिक कोरोनारुग्ण आढळून येत असल्याने हे दोन्ही शहर कंन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कोरोनाची झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या हा सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. अमरावतीमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत अद्याप अधिकृत कुठलीही माहिती उपलब्ध नाही. नागरिकांची तारांबळ उडता कामा नये, यासाठी सोमवारी दिवसभर अनलॉक राहणार असून रात्री आठनंतर लॉकडाउनला सुरुवात होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. लॉकडाउनच्या नियमांचे पालन न करणा-यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.  

अमरावतीचा मृत्यूदर १.६ टक्के

अमरावतीमध्ये कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असले तरी मृत्यूदर मात्र राज्याइतकाच म्हणजे १.६ टक्के आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.   

बेड्सची संख्या वाढविणार 

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने दाखल आहेत. १४०० बेड्सची क्षमता असली तरी आणखी २०० बेड्स नव्याने वाढविण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com