अमरावती मतदारसंघात इच्छुकांच्या गर्दीने चुरस

अमरावती मतदारसंघात इच्छुकांच्या गर्दीने चुरस

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, रिपब्लिकन नेते रा. सु. गवई अशा दिग्गजांचा अमरावती मतदारसंघ मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला. १९९९ मध्ये शिवसेनेच्या अनंत गुढे यांनी त्याला सुरुंग लावला. तेव्हापासून अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडे शाबूत आहे. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातील उमेदवारीबाबत अनेक नावांची चर्चा आहे, त्यामुळेच मतदारसंघातील चुरस वाढली आहे.

गेल्या दोन निवडणुकांपासून शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी मतदारसंघ ताब्यात ठेवलाय. गेल्या निवडणुकीत आमदार रवी राणा यांच्या अर्धांगिनी नवनीत राणा यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच मतदारसंघात पक्षाचा अधिकृत उमेदवार दिला होता. रा. सु. गवई यांनीदेखील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र यांना आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीच्या समर्थनाने रिंगणात उतरूनही विजय मिळविता आला नाही. या वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या दिनेश बूब यांना स्थानिक नेत्यांनी पुढे आणले आहे. दुसरीकडे नवनीत राणा यांच्यासाठी रवी राणा राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. डॉ. राजेंद्र गवई राष्ट्रवादीकडून लढण्याचा निर्णय अधांतरीच आहे.

आधी बहुजन समाज पक्षात असलेले उद्योजक गुणवंत देवपारे या वेळी भारिप-बमसं वंचित आघाडीकडून राहतील, तर नवनीत राणा यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी त्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे रिंगणात उतरतील, हे नक्की. त्यामुळे अडसूळ यांच्यापुढे नवनीत राणा, गुणवंत देवपारे, डॉ. राजेंद्र गवई यांचे आव्हान असेल.

प्रश्‍न मतदारसंघाचे
विमानतळाचे रखडलेले काम
बडनेरा येथील रेल्वे वॅगन कारखान्याला मुहूर्त सापडेना.
ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजचा मुद्दा प्रलंबित.
सिंचन प्रकल्पांना गती नसल्याने शेतीचा प्रश्‍न गंभीर.
चिखलदरा तालुक्‍यातील ब्रह्मासती नदीवरील धरण अधांतरीच. 

२०१४ चे मतविभाजन
आनंदराव अडसूळ (शिवसेना) - ४,६७,२१२ (विजयी)
नवनीत राणा (राष्ट्रवादी) - ३,२९,२८० 
गुणवंत देवपारे (बसप) - ९८,२०० 
डॉ. राजेंद्र गवई (रिपाइं) - ५४,२७८ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com