एफआयआरमध्ये नमूद होणार दुसरा डीव्हीआर!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

नागपूर : डीव्हीआर चोरीच्या एफआयआरमध्ये दुसऱ्या डीव्हीआरचीही नोंद होणार आहे. तशा हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आज जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक ओला यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते.

नागपूर : डीव्हीआर चोरीच्या एफआयआरमध्ये दुसऱ्या डीव्हीआरचीही नोंद होणार आहे. तशा हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आज जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक ओला यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते.
रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उमरेड विधानसभा क्षेत्रातील आयटीआय परिसरात तात्पुरती स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली होती. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन ते चार दिवसांदरम्यान येथील सीसीटीव्हीचे डीव्हीआर आणि दोन एलसीडी स्क्रीन चोरीला गेल्याचे समोर आले. चोरीच्या घटनेच्या 12 दिवसांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये एक डीव्हीआर आणि दोन एलसीडी स्क्रीन चोरीला गेल्याचे नोंदविण्यात आले. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस उमेदवार यांनी याची तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. मुख्य निवडणूक आयुक्तांकडून चौकशीसाठी पथकही पाठविण्यात आले. पथक येण्याच्या पूर्वीच दोन डीव्हीआर चोरट्यांनी परत केले. जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी एक नव्हे तर दोन डीव्हीआर चोरीला गेल्याचा खुलासा गुरुवारला केला. त्यापूर्वी प्रशासनाकडून एक डीव्हीआर व दोन एलसीडी स्क्रीन चोरीला गेल्याचे सांगण्यात येत होते. दोन डीव्हीआर चोरीला गेले असताना "एफआयआर'मध्ये एकाची नोंद असल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रकाशित होताच महसूल आणि पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. त्यामुळे आता दुसऱ्या डीव्हीआरची नोंद एफआयआरमध्ये करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केल्याचे समजते.
स्थानिक अधिकाऱ्यांना नव्हती डीव्हीआरच्या संख्येची माहिती?
स्ट्रॉंग रूम आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे कंत्राट देण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमरेडचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला. त्यात प्रकरणाची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. चोरीचा एफआयआर 15 दिवसांपूर्वी करण्यात आला. त्यानंतर निवडणूक विभागाकडून दोन डीव्हीआरची माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. चोरट्यांनीच दोन डीव्हीआर परत केल्यावर याचा भंडाफोड झाला. त्यामुळे स्थानिक निवडणूक प्रशासनाला स्ट्रॉंग रूम परिसरात किती डीव्हीआर लावले होते, याची माहिती होती का, अशी चर्चा निवडणूक विभागात रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loksbha election news