लोंढे, देशमुख यांना उद्यापर्यंत पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नागपूर - क्‍लाऊड सेव्हन बारचा संचालक सनी उर्फ सावन प्रमोद बम्रोतवारचा खून करण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यातील आरोपी स्वप्निल देशमुख व अक्षय लोंढे यांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात उपस्थित केले. आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

नागपूर - क्‍लाऊड सेव्हन बारचा संचालक सनी उर्फ सावन प्रमोद बम्रोतवारचा खून करण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यातील आरोपी स्वप्निल देशमुख व अक्षय लोंढे यांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात उपस्थित केले. आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

प्रकरणातील मुख्य आरोपी आमदारपुत्र अभिलाष खोपडे व रोहित खोपडे हे दोघेही पसार आहेत. स्वप्निल व अक्षयला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेने अटक केली होती. मोहसीन खेडीकरला मंगळवारीच अटक करण्यात आली होती. रविवारी मध्यरात्री अभिलाष, अक्षय खांडरे, स्वप्निल देशमुख व अक्षय लोंढे हे दारू पिण्यासाठी शंकरनगर चौकातील बारमध्ये गेले होते. बिल कमी करण्यावरून बारमालक सनी बम्रोतवारशी वाद झाला. अभिलाष खोपडेने लहान भाऊ रोहित व शुभम महाकाळकरला फोन करून बोलावले. त्यांनी बारची तोडफोड केली व सनीचा खून करण्याचा प्रयत्न केला. 

त्यानंतर सनीचा भाऊ शोभीत, वडील प्रमोद व अन्य सात ते आठ युवकांनी लक्ष्मीभुवन चोकात शुभम महाकाळकरचा खून केला. या प्रकरणात गुन्हे शाखेने प्रमोद आणि मुलगा शोभीतसह विवेक भालेकर, पराग यादव, कपिल अरखेल यांना अटक केली होती. मोहसीन खेडीकर, स्वप्नील देशमुख व अक्षय लोंढे यांना अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. 

रुग्णालयात गार्ड ड्यूटी नाही 
लकडगंजमधील अनुराधा हॉस्पिटलमध्ये आरोपी अभिलाष खोपडेवर उपचार सुरू आहे. तेथे एकही पोलिस कर्मचारी कर्तव्यावर नाही, हे विशेष. दुसरीकडे खोपडे यांचे समर्थक पहारा देत आहेत. 

बारचा परवाना 45 दिवसांसाठी निलंबित 
क्‍लाऊड सेव्हन बारमध्ये सुरक्षाव्यवस्था नसल्यामुळे तसेच योग्य त्या सुविधा नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना 45 दिवसांसाठी निलंबित केला आहे. 

Web Title: Londhe, Deshmukh in police custody