जीवनाच्या परीक्षेत प्रणय अनुत्तीर्ण

सुधीर बुटे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

काटोल : घराचा एकुलता, तेवढाच लाडका अन्‌ अभ्यासातही हुशार असल्याने तो सर्वांचाच आवडता होता. त्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. नियुक्तीचे पत्र न आल्याने तो वनविभागाच्या वनरक्षकाच्या शारीरिक चाचणीसाठी नागपुरात आला. पात्रतेसाठी 25 किमीचे अंतर निर्धारित वेळात वेगाने चालून पार करताना तो जवळपास पोहोचला असतानाच जीवनाच्या परीक्षेत मात्र कायमचा अनुत्तीर्ण झाला. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाल्याने काटोल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

काटोल लक्ष्मीनगर येथील प्रणय टीकाराम ढोबळे (वय 26, मूळगाव खंडाळा, ता. काटोल) याची वनपरिक्षेत्र अधिकारी या पदासाठीच्या लेखी परीक्षेसाठी निवड झाली होती. तसेच विक्रीकर अधिकारी या पदासाठीही पात्र ठरला होता. दरम्यान, 9 सप्टेंबरला मिहान परिसरात वनरक्षकाच्या शारीरिक चाचणीसाठी आला होता. या चाचणीत पात्र होण्यासाठी चार तासांत 25 किलोमीटर चालणे बंधनकारक होते. सकाळी 9 वाजता चाचणीला सुरुवात झाली. चाचणीत सुमारे 16 किमी अंतर पार केल्यानंतर त्याला चक्कर आली व तो खाली पडला. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्याला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती खालावत असल्याने त्याने एका खासगी रुग्णालयात पुढील उपचार सुरू केला. प्रणय बेशुद्धावस्थेतून कोमात गेल्याचे त्याच्या निकटवर्तींनी सांगितले. 19 सप्टेंबरला तब्येतीत सुधार झाला. कुटुंबातील सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पण, प्रकृती परत बिघडली. 29 तारखेला त्याची प्राणज्योत मालवली.
कुटुंबाचा आधार व अनेक मित्रांसाठी आदर्श असलेल्या प्रणयच्या निधनाची बातमी कळताच काटोलात हळहळ पसरली. त्याच्या अंत्यसंस्काराला राजकीय मंडळीसह मोठा जण समुदाय उपस्थित होता.
आई-वडील दोघेही शिक्षक
प्रणयचे वडील नरखेडच्या जिल्हा परिषद शाळेत तर आई पारडसिंगा येथील एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. प्रणयला लहान बहीण आहे. त्याला अधिकारी व्हायचे असल्याने पाच वर्षांपूर्वी त्याने अभ्यासाला सुरुवात केली होती. पाच वर्षे अथक मेहनत घेतल्यावर त्याला दोन स्पर्धा परीक्षांत यश आले होते.
अनेक ठिकाणी झाले सत्कार
प्रणयची निवड विक्रीकर अधिकारी व अन्य शासकीय खात्यात झाल्याने त्याचा व त्याच्या पालकांचा काटोलात विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला होता. काटोल शिक्षण विभाग, विश्वेश्वर वाचनालय, नबीरा महाविद्यालय, राजकीय मंडळींनी शानदार कार्यक्रमात सत्कार केला होता. यामुळे त्याच्या अकस्मात जाण्याने सर्वांनीच शोक व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love test failed in life