एकमेकांच्या हाताला रुमाल बांधून प्रेमीयुगुलाने घेतली वैनगंगा नदीत उडी; पोलिसांकडून शोध सुरू

साईनाथ सोनटक्के
Saturday, 24 October 2020

पुलावर वाहन उभे केले. त्यानंतर दोघेही कठड्यावर चढले. एकमेकांच्या हाताला रुमाल बांधला. त्यानंतर हातात हात घेऊन नदीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा केला.

व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) : गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रेमीयुगुलाने वैनगंगा नदीत उडी घेतली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर घडली. प्रदीप राजू गिरडकर (वय २०) असे युवकाचे तर कांचन अरविंद नागोसे (वय १७) असे युवतीचे नाव आहे. अंधार पडेपर्यंत पोलिसांनी त्यांना नदीत शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचाही पत्ता लागला नाही.

गडचिरोली येथील रामनगर परिसरातील प्रदीप गिरडकर हा युवक बारावीचे शिक्षण घेत होता. प्रदीपचे फॉरेस्ट कॉलनी येथील कांचन नागोसे या दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. शुक्रवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास प्रदीप आणि कांचन दोघेही दुचाकी वाहनाने घराबाहेर पडले. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास दोघे वैनगंगा नदी काठावर पोहोचले.

अधिक वाचा - VIDEO: मृत्यूचा 'अभद्र योगायोग'; या गावात एकाचा मृत्यू झाला तर आठवडाभरात दुसरा जातोच; नागरिकांची वाढते धाकधूक

पुलावर वाहन उभे केले. त्यानंतर दोघेही कठड्यावर चढले. एकमेकांच्या हाताला रुमाल बांधला. त्यानंतर हातात हात घेऊन नदीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर दोघांचाही शोध सुरू केला. मात्र, वृत्तलिहिस्तोवर दोघेही आढळून आले नाही. त्यांनी नदीत उडी घेण्यामागील कारण कळू शकले नाही. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lover's jumped into the Wainganga river