लम्पी आजाराने पशुपालक भयभीत

त्वरित लसीकरण करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी
Lampi Disease
Lampi Diseaseesakal

शिरपूर जैन : वाशीम जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन या जनावरांवर होणाऱ्या आजाराचा शिरकाव केला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने तातडीने या आजारावरील लसीची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनावर विविध आजार होत असतात .पावसाळ्यामध्ये असणारे दूषित वातावरण तसेच विविध ठिकाणी साचणारे पावसाचे पाणी व यामुळे त्यावर कीटकांचे प्रमाण वाढत असते. जनावरांना होणारा लम्पी स्कीन आजार हा गोचीड व गोमाशी यांच्या चाव्यातून सदर रोगाचा प्रादुर्भाव जनावरांना होतो. वाशीम जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये सदर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

सदर रोगाचा संसर्ग थांबण्यासाठी दिनांक १२ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने जनावरांच्या बाजारावर पुढील आदेशापर्यंत बंदी आणली आहे. सदर आजाराचा फैलाव थांबवण्यासाठी या आजारावरील गोट पॉक्स नावाची लस पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये विनामूल्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. गतवर्षी सुद्धा या आजाराचा फैलाव झाला होता. मात्र पशुसंवर्धन विभागाकडून त्वरित लस उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र सध्या शिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आजारावरील लस उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे.

दिनांक १३ सप्टेंबर रोजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशानुसार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सदर आजारावरील लस व गोचीड आणि गोमाशी नष्ट करण्यासाठीची औषधी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून दहा हजार रुपयाची तरतूद करून औषधी व लस उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जनावरांच्या या आजारावर आता ग्रामपंचायतीलाच लवकर निर्णय घेऊन लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी लम्पी स्कीन या आजाराचा शिरकाव होऊनही अद्याप लस उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने लवकरात लवकर लसीकरणाची व्यवस्था करावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com