कांबळेंचा भाजपप्रवेश वेटिंगवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

अकोला - राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव मधुकर कांबळे यांची पावले पुन्हा भाजपकडे वळल्याची चर्चा होती. मात्र, राज्यमंत्रिपदी वर्णी लागून सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी मधुकररावांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त अद्यापही निघाला नाही. त्यामुळे मधुकरराव भाजपवासी की कॉंग्रेसवासी, अशी चर्चा रंगली आहे. पश्‍चिम विदर्भातील राजकारणात मधुकरराव कांबळे हे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लहुजी साळवे यांच्या विचारांनी प्रेरित होत 1975 पासून मधुकरराव समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाले. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय द्यायचा असेल तर राजकीय व्यासपीठाशिवाय पर्याय नाही, हे हेरून त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने 1993 मध्ये त्यांना महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते.
Web Title: madhukarrao kamble BJP entry politics