मधूला पोलिस सुरक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नागपूर : कुलर व्यापारी ऋषी खोसला हत्याकांडानंतर मिक्‍की बक्षीची दहशत अजूनही कायम आहे. पत्नी मधू हिला चोवीस तास पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. दोन महिला पोलिस कर्मचारी चोवीस तास मधूसोबत सुरक्षेसाठी तैनात केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागपूर : कुलर व्यापारी ऋषी खोसला हत्याकांडानंतर मिक्‍की बक्षीची दहशत अजूनही कायम आहे. पत्नी मधू हिला चोवीस तास पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. दोन महिला पोलिस कर्मचारी चोवीस तास मधूसोबत सुरक्षेसाठी तैनात केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी खोसला व मधू बक्षी यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे मधूचा पती मिक्‍की बक्षी त्रस्त झाला होता. त्याने ऋषी व मधूचा "गेम' करण्याचा प्लान केला होता. मिक्‍कीने कुख्यात गुंड गिरीश दासरवारला एक कोटी 10 लाखांत सुपारी दिली होती, अशी चर्चा आहे. चार गुंडांच्या मदतीने गिरीश दासरवारने ऋषी खोसलाचा खून केला. मधू व ऋषीचा एकाच वेळी खात्मा करण्याची योजना आरोपींची होती. मात्र, गाडी पंक्‍चर झाल्यामुळे मधू ऋषीसोबत नव्हती. दोघेही एकाच कारमध्ये असते तर मधूचाही खून झाला असता, अशी चर्चा आहे.
ऋषीचा खून झाल्याची माहिती मिळताच मधू फुटाळा तलावावर गेली. तेथून तिने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोन केला. "माझा पती मिक्‍की बक्षीने ऋषीचा खून केला. त्यामुळे त्याला ताबडतोब अटक करा, अन्यथा मी फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या करेन,' अशी धमकी दिली. पोलिसांनी लगेच फुटाळा तलावावर धाव घेतली. मधूने पोलिस कर्मचाऱ्यांनाही पाण्यात उडी घेण्याची धमकी देत दूर राहण्यास सांगितले. जोपर्यंत मिक्‍कीला अटक करीत नाहीत, तोपर्यंत मी फुटाळ्याच्या खाली उतरणार नाही, अशी धमकी दिली. पोलिसांनी मिक्‍कीला अटक करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ती शांत झाली. मात्र, मधू आत्महत्या करू शकते किंवा तिचा मिक्‍की खून करू शकतो, अशी पोलिसांना भीती आहे. त्यामुळे तिला सध्या चोवीस तास पोलिस संरक्षण दिल्याची माहिती सदरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बनसोडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhula police protection