माधुरी मडावी यांचा राजीनामा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

नागपूर : नरखेडच्या मुख्याधिकारी तसेच अलीकडेच अमरावती विभागीय कार्यालयात नगररचना सहाय्यक संचालक म्हणून बढती मिळालेल्या अधिकारी माधुरी मुरारी मडावी यांनी नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती अमरावती विभागीय कार्यालयातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचा कार्यकाळ चांगलाच गाजला.

नागपूर : नरखेडच्या मुख्याधिकारी तसेच अलीकडेच अमरावती विभागीय कार्यालयात नगररचना सहाय्यक संचालक म्हणून बढती मिळालेल्या अधिकारी माधुरी मुरारी मडावी यांनी नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती अमरावती विभागीय कार्यालयातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचा कार्यकाळ चांगलाच गाजला.
अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी मडावी यांचा राजीनामा सरकारकडे मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कळमेश्‍वर, नरखेड, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी होत्या. काटोल आणि कामठीच्या प्रभारीसुद्धा होत्या. सर्वच ठिकाणी त्यांचे तत्कालीन पदाधिकाऱ्यांसोबत चांगलेच वाद झाले होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून त्या राज्य शासनाच्या सेवेत रामटेकच्या मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. तत्कालीन आमदार आशीष जयस्वाल यांनी पोलिसात गुन्हा नोंदविला होता. कळमेश्‍वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी असताना पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोधाचा सामना करावा लागला होता. याचा वादातून कळमेश्‍वरचे नगराध्यक्ष अशोक धुलंदर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल घेतले होते. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषदेत असताना एका पत्रकाराविरुद्ध त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. काटोलच्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून अतिक्रमणाविरुद्ध त्यांनी केलेली कारवाई आजही अनेकांच्या मनात धडकी भरविणारी आहे. नरखेडमध्ये मंदाकिनी नदीच्या पुलाच्या बांधकामाच्या वादामुळे गाव दोन गटांत विभागले गेले होते. त्यांच्याविरुद्ध पदाधिकाऱ्यांनी विषय समितीची निवडणूक रद्द केल्याचा आक्षेप नोंदविला होता. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी त्यांच्यावर प्रशासकीय अज्ञानाचा ठपका ठेवला होता. त्यानंतर अमरावती येथे त्यांची बदली झाली. रुजू झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.राजीनामा आवक विभागाच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांना 30 जुलैला मिळाला. विभागीय आयुक्तांनी 5 ऑगस्ट राजीनामा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला असल्याची विश्‍वसनीय माहिती मिळाली आहे.
राजकारणात उतरणार?
माधुरी मडावी यांची पार्श्‍वभूमी राजकीय आहे. नागपूर विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्यसुद्धा होत्या. शासकीय नोकरीत येण्यापूर्वी त्या गडचिरोली नगर परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यसुद्धा होत्या. शिक्षण सभापती म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. हे लक्षात घेता त्या पुन्हा राजकारणात प्रवेश करतील अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्या वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचे समजते.

मी राजीनामा दिलेला नाही. तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे.
- माधुरी मडावी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhuri Madavi resigns