महाविकास आघाडीचे सरकार मराठा विरोधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

शिवसंग्राम पक्ष महायुतीत महत्त्वाचा साथीदार राहिला आहे आणि भविष्यातही सर्व निवडणुका महायुतीतच लढणार असल्याचा दावा केला.

वाशीम : मागील देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी आरक्षण दिले. मराठा समाजातील लोकांना सरकार नोकऱ्यांमध्ये शिरकाव करण्यासाठी सारथी सारख्या संस्थेची उभारणी केली. आता हे महाविकास आघाडीचे सरकार सारथीचा स्वायत्तपणा काढून घेत आहे. त्यामुळे हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे. असा आरोप शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला.

शक्य झाल्यास जि. प. निवडणुका महायुतीतच
वाशीम येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आघाडी जिल्हा परिषद निवडणुका शक्य झाल्यास महायुतीतच निवडणुका लढणार असून, शक्य नसल्यास स्वबळाची चाचपणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

हेही वाचा - अबब...वीज चोरीचे अजबगजब फंडे

सारथी संस्थेला मोडीत काढण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी आरक्षणाची तरतूद केली. युवकांसाठी सारथीसारख्या स्वायत्त संस्था उभारल्या. मात्र, हे नविन सरकार सारथी संस्थेला मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप त्यांनी केला. यावेळी संदीप पाटील, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील गोळे यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा - विद्यार्थिनींनी घडविले तंत्रज्ञानातून कौशल्याचे दर्शन

शिवसंग्रामवर अन्यायच झाला
गेल्या पाच वर्षात बोलणी करूनही शिवसंग्रामला एकही मंत्रिपद दिले नाही. शिवसंग्रामवर अन्याय होता परंतु आम्ही महायुतीच्या बैठकीत चर्चा करणार आहोत. उघडपणे नाराजी कधीच व्यक्त केली नाही. असा टोलाही त्यांनी महादेव जानकरांच्या परळी येथील भाषणाचा संदर्भ घेवून दिला. शिवसंग्राम पक्ष महायुतीत महत्त्वाचा साथीदार राहिला आहे आणि भविष्यातही सर्व निवडणुका महायुतीतच लढणार असल्याचा दावा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maha vikas aaghadi government opposite to Marathas