स्मशानभूमी नव्हे विश्रांतीस्थळ!

गणेश भोयर
गुरुवार, 22 मार्च 2018

गावातील युवकांनी ध्येय निश्‍चित करून काटेरी जंगलाचे सुखकारक विश्रांतीस्थळात रूपांतर केले. त्यांच्या पुढाकारातून गावकऱ्यांचे स्वप्न साकार झाले.
- साहेबराव पाटील-कदम, अध्यक्ष, गांधी तंटामुक्त समिती, हिवरा

महागाव (जि. यवतमाळ) - सरकारची कसलीही मदत न घेता, ग्रामस्थांचे अर्थसाह्य अन्‌ युवकांचा पुढाकार काय चमत्कार घडवू शकतो? याचे उदाहरण म्हणजे हिरवासंगमची स्मशानभूमी. स्मशानाच्या परिसरात वृक्षवल्लींमुळे विश्रांतीस्थळ बहरलंय. पुष्पावती आणि पैनगंगा नद्यांच्या संगमावरील हे स्थळ ग्रामस्थांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे.

हिवरासंगमची स्मशानभूमी कित्येक वर्षे दुर्लक्षित, काटेरी झुडपांनी वेढलेली होती. दोन एकरावरच्या स्मशानात अंत्यसंस्कार म्हणजे तारेवरची कसरत होती. एरव्ही, स्मशान अंगावर काटा येतो. जीवनाच्या अखेरच्या क्षणी इथे विसावा घ्यावा लागतो, हे अंतिम सत्य असले, तरी अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत अनेकानेक अडचणींना सामोरे जावे लागायचे. हे लक्षात घेऊन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष साहेबराव पाटील कदम यांनी ग्रामस्थांची सभा घेतली. स्मशानभूमी विकासासाठी समिती स्थापली. ग्रामस्थांनीही तन-मन-धनाने मदत केली. पहिल्यांदा झाडीझुडपे तोडून जमिनीचे सपाटीकरण करून वृक्षारोपण केले.

आराखडापूर्ण उद्यानाची उभारणी केली. झाडांना ठिबक सिंचनद्वारे पाण्याचे व्यवस्थापन केले. सिमेंटचे बाक बसवले. मुंबईवरून सुविधायुक्त शववाहिका आणली. स्मशानभूमीत भगवान शंकरांची सहा फूट उंचीची मूर्ती बसवली. पुष्पावती आणि पैनगंगा यांच्या संगमावर आणि आठवे शक्तीपीठ असलेल्या एकवीरा देवीच्या पायथ्याशी निसर्गरम्य मोक्षधाम तयार झाले. 2014 मध्ये "एक गाव, एक गणपती' स्थापन करून लोकवर्गणीतून रुग्णवाहिका खरेदी केली. त्याद्वारे स्थानिकांना आरोग्याच्या सुविधा मिळू लागल्या. या कार्याची दखल घेत सरकारने गावाला महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्कार देऊन गौरवले.

Web Title: mahagaon news hivarasangam place smashanbhumi