esakal | ‘महानुभाव स्थान महात्म्य अभियाना’च्या लोगोचे अनावरण करताना संत, महंत | Amravati
sakal

बोलून बातमी शोधा

vidarbha

‘महानुभाव स्थान महात्म्य अभियाना’च्या लोगोचे अनावरण करताना संत, महंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिद्धपूर (जि. अमरावती) : महानुभाव पंथियांची काशी असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपुरात ‘सकाळ’वर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. कोरोनामुळे बऱ्याच दिवसांपासून मंदिरे बंद होती, गुरुवारी मंदिरे उघडली गेली, त्यावेळी रिद्धपुरात एकत्र आलेली महानुभाव आचार्य, संत-महंत मंडळींनी ‘सकाळ’द्वारे राबविण्यात येणाऱ्या ‘महानुभाव स्थान महात्म्य’ अभियानाचे स्वागत केले.

श्री गोविंदप्रभूंची कर्मभूमी असलेल्या रिद्धपूरचे प्रमुख मंदिर ‘राजमठा’चा फोटो ‘सकाळ’च्या मानचिन्हात आहे. त्याच मंदिराच्या प्रांगणात आज, ७ ऑक्टोबर रोजी महानुभाव धर्माचार्यांनी या अभियानाचे स्वागत केले. लोगोचे अनावरणही यावेळी झाले. उपाध्य आम्नायाचार्य श्री यक्षदेवबाबा शास्त्री म्हणाले, काळाची गरज ओळखून ‘सकाळ’ने हाती घेतलेला उपक्रम पूर्णत्वास जाणार यात शंका नाही. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलभूषण आचार्य महंत श्री नागराजबाबा शास्त्री म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात असलेल्या पंचावतार चरणांकित पवित्र तीर्थस्थानांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ‘सकाळ’द्वारा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. या पवित्र कार्यास सहयोग दिल्याबद्दल ‘सकाळ’ परिवाराचे अखिल भारतीय महानुभाव परिषदेतर्फे अभिनंदन.

हेही वाचा: तुटपुंजा पगार अन् आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

यावेळी कविश्वरकुलाचार्य श्री दर्यापूरकर बाबा, उपाध्य आम्नायाचार्य श्री पैठणकर बाबा, आचार्य श्री पाचराऊत बाबा, महंत श्री तळेगावकर बाबा, महंत श्री जायराज बाबा, महंत श्री सेवात्कर बाबा, महंत श्री कल्याणकर बाबा, महंत श्री डोळसकर बाबा, पू. श्री प्रसन्नशास्री कविश्वर, पू श्री राहुलमुनी शिवनेकर, पू. श्री ऋषीराज पैठणकर यांच्यासह श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील अनेक आचार्य संत-महंतांसहित राहुल धर्माळे (अमरावती) उपस्थित होते. नागपूरचे हरिहर पांडे यांनी ‘सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी अष्टशताब्दी अवतरण वर्षानिमित्त’ ‘सकाळ’द्वारे राबविल्या जाणाऱ्या अभियानाची माहिती ठेवली.

महानुभावांची १६५० तीर्थस्थाने, २४५ गावे ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित व्हावीत, सर्व तीर्थस्थानांची शासन दरबारी नोंद होऊन सातबारावर नोंद असावी, या समाजान्मुख कार्यासाठी हे अभियान आहे. श्री गोविंदप्रभू जयंतीपासून झालेल्या या अभियानाचे स्वागत महानुभाव पंथातील प्रमुख तीनही कुलाचार्य म्हणजेच उपाध्यकुलाचार्य महंत बिडकरबाबा, कविश्वरकुलाचार्य महंत श्री खामणीकर बाबा आणि परिमांडल्यकुलाचार्य महंत श्री लासुरकर बाबा यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यात करण्यात आले होते. या अभियानाचे रिद्धपुरातील सर्वांसह अखिल भारतीय महानुभाव परिषदेनेही स्वागत केले. या अभियानात सहभागी होण्यासाठी समन्वयक हरिहर पांडे (९६२३८०२०२०) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रेयप्रभू, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंदप्रभू व मराठी भाषेची जननी सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थानाचे महात्म्य ‘सकाळ’ने ओळखले, या अभियानास हार्दिक शुभेच्छा.

- कविश्वरकुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा, महानुभाव आश्रम, राजापेठ, अमरावती

महाराष्ट्रात असलेल्या पंचावतार चरणांकित पवित्र तीर्थस्थानांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी हे अभियान आहे. या पवित्र कार्यास सहयोग केल्याबद्दल सकाळ परिवाराचे अखिल भारतीय महानुभाव परिषदेतर्फे हार्दिक अभिनंदन.

- कविश्वर कुलभूषण आचार्य महंत श्रीनागराज बाबाजी उपाख्य महंत श्री गोपीराज बाबा शास्त्री, अध्यक्ष, अ. भा. महानुभाव परिषद, श्रीक्षेत्र रिद्धपूर

loading image
go to top