महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नागपूर : सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या महाराजबागेसह राज्यातील चार प्राणिसंग्रहालयांची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) रद्द केली आहे. सीझेडएच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा न केल्याने ही कारवाई केली आहे.

नागपूर : सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या महाराजबागेसह राज्यातील चार प्राणिसंग्रहालयांची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) रद्द केली आहे. सीझेडएच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा न केल्याने ही कारवाई केली आहे.
महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केल्याने आता वन्यप्रेमींना पाहण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. देशभरातील प्राणिसंग्रहालयांचे निरीक्षण करून सीझेडए त्याला मान्यता देते. त्यानुसार राज्यातील प्राणिसंग्रहालयांची पाहणी केली. त्यात औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन, सोलापूर येथील महानगरपालिकेचे महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय, कोल्हापुरातील ढोलगरवाडी येथील स्नेकपार्कने सीझेडएच्या अटींची पूर्तता न केल्याने त्यांची मान्यता रद्द केली आहे. या सर्वच प्राणिसंग्रहालयांच्या त्रुटी दूर करून सहा महिन्यांत सीझेडएकडे दाद मागता येणार आहे.
महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला 31 डिसेंबर 2017 पर्यंत मान्यता दिली होती. त्यानंतरही त्रुटी दूर करण्याच्या अटीवर सीझेडएने मान्यतेला मुदतवाढ दिलेली होती. एक डिसेंबरपर्यंत त्रुटी दूर न केल्यानेच प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे. त्या पत्रात संग्रहालयात सुरू असलेले योगासने, मॉर्निग वॉक, बालोद्यान वेगळे करणे, संरक्षण भिंत बनविणे, प्लॅस्टिकचा वापर बंद करणे, भटकणाऱ्या प्राण्यांना थांबवणे, नियुक्त अधिकाऱ्यांना प्रशासकीय व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, वन्यप्राण्यांना योग्य पिंजऱ्यात न ठेवणे, वन्यप्राण्यांची नियमानुसार नोंदणी न ठेवणे, अतिरिक्त पक्ष्यांची विल्हेवाट न लावणे, वन्यप्राण्यांची काळजी न घेणे, वन्यप्राणी आणणे व स्थानांतरणासाठी सीझेडएची परवानगी न घेणे आदी अटीची पूर्तता न केल्याने मान्यता रद्द केलेली आहे.
प्राणिसंग्रहालयात वाघासह बिबट आणि अन्य वन्यप्राणी आहेत. ते पाहण्यासाठी पर्यटकांची कायम गर्दी असते. मात्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालाच प्राणिसंग्रहालयाच्या विकासात स्वारस्य नाही. त्यामुळेच प्राणिसंग्रहालयाचा सुधारित मास्टर प्लान तयार केलेला नसल्याची माहिती पुढे आली. फेब्रुवारी 2018 मध्ये सीझेडएच्या चमूने महाराजबागेची पाहणी केली होती. दरम्यान, महाराजबागेतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जुलै महिन्यात दिल्ली येथे बैठक झाली होती. त्यावेळी त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप त्याची पूर्तता न झाल्याने मान्यता रद्द केलेली आहे.
मान्यता रद्द झालेली प्राणिसंग्रहालये
सिद्धार्थ गार्डन (औरंगाबाद), महानगरपालिकेचे महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय (सोलापूर), ढोलगरवाडी येथील स्नेकपार्क (कोल्हापूर).

 

Web Title: maharajbag news in nagpur