महाराष्ट्र दिन : महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचं लेणं, या पर्यटनस्थळांनी केलंंय समृध्द

maharashtra day forts and tourisum in maharashtra
maharashtra day forts and tourisum in maharashtra

अकोला ः आज १ मे अर्थात महाराष्ट्र दिन. हा दिवस तसा पहिली ते आठवी आणि अकरावीतील मुलांसाठी गुणपत्रिका आणि गुणगौरव सोहळा असतो. वर्षभर विविध क्षेत्रात कर्तृत्व मिळविलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पदकं देऊन, तर राज्य शासनाकडून गुणवंत कामगार असे पुरस्कार देऊन सन्मान केल्या जातो. मोठा सोहळा, पोलिसांची परेड, शाळा-महाविद्यालायतील विद्यार्थ्यांची एनसीसी, स्काऊटची परेड अशा अनेकविध कार्यक्रमांची दिवसभर मेजवाणी असते. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्व कार्यक्रम रद्द केले गेले आहेत. 

महाराष्ट्रात राहणाऱ्या सुज्ञ नागरिकांना नाराज होण्याचं काहीच कारण नाही. केंद्र व राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण कोरोनाला हरविण्यासाठी घरीच बसून लढत आहोत. महाराष्ट्राने याआधीही खूप मोठी संकटे लिलया पेलली आहेत. मात्र, महाराष्ट्र दिन म्हणजे काय? महाराष्ट्राबद्दल आणखी काय अशी उत्सुकता बऱ्याच जणांना लागलेली आहे. तर.. 

भारत देशातील आपल्या या महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण करण्याची ताकद आहे आणि हे आपल्याला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले आहे. ही भूमी संतांची, गड-किल्ल्यांची, लेण्यांची आणि पुरातन मंदिरांची आहे. जैवविविधतेने नटलेला येथील घाटमाथा म्हणजे महाराष्ट्राचा जणू काही श्वासच! 

इंथल्या काळ्या मातीत पिकतं सोनं
कोकण, मावळ, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ असे विविध प्रांत जणू महाराष्ट्राचे अवयव! पंढरीची वारी, विविध ठिकाणच्या जत्रा, गणेशोत्सव, दहीहंडी, होळी, शिवजयंती आणि इतर सण म्हणजे आपल्या संस्कृतीची ओळख आहे. महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे उत्तुंग असे गड रायगड, राजगड, प्रतापगड आणि सुमारे छोट्या-मोठ्या पाचशे किल्ल्यांनी नटलेली ही भूमी आहे. सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचा सखा सोबती तसेच त्यातील आकाशाशी स्पर्धा करणारे उंच शिखर म्हणजे कळसूबाई, आजही त्याच्याकडे पाहून गौरवास्पद वाटते. या महाराष्ट्रात जेव्हा मोसमी वारे येतात तेव्हा ही भूमी खऱ्या अर्थाने मायेच्या ओलाव्याने सुखावते आणि याच ओलाव्यात येथील शेतकरी बांधव काळ्या भूमीतून सोनं पिकवतो. हो! इथे भातशेती, ऊस, कडधान्य, भाज्या अशी जवळ जवळ सर्वच पीकं जोमाने पिकतात म्हणूनच ही भूमी सुजलाम-सुफलाम आहे. 

पर्यटनासोबत जपली धार्मिक सहिष्णुता!
महाराष्ट्रातील पर्यटनही खासंच. कारण सर्वच विविध प्रकारच्या स्थळांनी व्यापलेली ही भूमी आहे. सुरुवात करायची झाली तर भारतात सुमारे बाराशे लेण्या आहेत, त्यातील आठशे लेण्या या एकट्या महाराष्ट्रात आहेत. साहजिकच लेण्यांच्या बाबतीतसुद्धा महाराष्ट्रच अग्रेसर आहे. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंत इथे लेण्या कोरल्या गेल्या. या भूमीत हा वास्तुप्रकार लोकप्रिय होण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील सह्याद्रीच्या डोंगरातील उत्कृष्ट प्रतीचा कातळ होय. शहरापासून दूर एकांतात आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या लेण्या आणि त्यातील अध्यात्मिक शांतता आपल्याला जाणीव करून देतात ती गौतमबुद्धांच्या वासाची, त्यावरील शिल्पकला आजच्या यांत्रिकी युगाला लाजवेल अशी आहे. महाराष्ट्राचे पर्यटन करताना इथे जाणवते धार्मिक सहिष्णुता! त्याकाळी येथील बहुसंख्य प्रजा नि इथले राजे धर्माने बौद्ध आणि जैन नसूनही त्यांनी जैन-बौद्ध लेण्यांच्या उभारणीला भरभरून साहाय्य केले, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या सर्व शिल्पांचा कळस म्हणजे औरंगाबादजवळील अजिंठा व वेरूळ येथील लेणी ही अफाट, अगाध आणि नजर खिळवून ठेवणारी आहे. या लेण्या आजही पाहताना अप्रतिम-शिल्प जिवंत वाटत राहतात. वेरुळच्या लेण्यांमध्ये असणारा अप्रतिमवास्तुकलेचा नमुना म्हणजे तेथील मंदिर! हे मंदिर ‘आधी कळस मग पाया रे’ या उक्तीप्रमाणे कोरलेले आहे. कळसापासून पायापर्यंत कोरताना कुठेही गडबड झालेली आढळत नाही आणि मग मात्र मनोमन वाटत राहते की, एकाग्र होऊन कठीण दगडात एकसंध मंदिर कोरणाऱ्यांच्या हातात देवच नांदत होता. धर्म प्रसाराच्या वेळी बौद्ध भिक्षुकांना पावसाळ्यात राहण्याचे ठिकाण म्हणजे या लेण्यांमधील विहार तसेच त्यांच्या ध्यानधारणेसाठी कोरलेल्या चैत्यगृहांमुळे महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर घातलेली आहे. हीनयान व महायान अशा दोन्ही पंथांच्या लेण्या आपल्याला या भूमीवर आढळतात. कोंडाणे, कान्हेरी, कुडा, घारापुरी, पितळखोरा, नाशिक, जुन्नर, कार्ले व भाजे अशा कितीतरी नामांकित लेण्या डोळ्यांचे पारणे फेडतात. संपूर्ण जगभरात अहिंसेची तत्त्वे मांडणारी आणि निरव शांतता जपणाऱ्या या मुकलेण्या म्हणजे एकाग्रशक्ती जागृत करण्याचे महत्वाचे ठिकाण आहे.

ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा संगम
जेजुरीचा व पालीचा खंडोबा, कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई), पंढरपूरचा विठोबा, देहू आळंदी आणि पैठण येथील मंदिरं म्हणजे गरिबांची हक्काची श्रद्धास्थानं! जेजुरीच्या खंडोबाचा गोंधळ, नवरात्रातील महालक्ष्मीचे तेज, पंढरीची दुमदुमणारी ती आषाढी कार्तिकेची वारी म्हणजे थोरा-मोठ्यांना, बाळ-गोपाळांना आणि वयोवृद्धांना एकत्र नांदायला लावणारी आणि ‘जय हरी विठ्ठला’च्या गजरात न थकता मैलोनमैल पावले चालत चालत पंढरपुरात दाखल करणारी, ही अद्भूत वारी फक्त महाराष्ट्रातच पाहता येते आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन देशी-विदेशी पर्यटकांना पुन्हा होते. ही वारी पाहण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी जगभरातील पर्यटक खास येत असतात.

जशा लेण्या तशीच काही पुरातन मंदिरं आजही ऊन, वारा आणि पाऊस यांना हजारो वर्ष तोंड देत तग धरून भाविकांच्या भक्तीसाठी उभे आहेत. १२ व्या शतकात जळगाव जिल्ह्यातील वाघळी या गावात उभे असलेले हे मुधईदेवीचे मंदिर आपल्या महाराष्ट्रातील स्थापत्याच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण असे एकमेव सूर्यमंदिर आहे. असेच एकमेव अतिशय भव्य असे १३ व्या शतकात स्थापन झालेले एक अप्रतिममंदिर जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्यात आहे. सुमारे १६ फूट लांबीचा गाभारा, १२ फूट रुंद आणि ४३ फूट चौरसमीटर मंडप असलेले, ९७ फूट उंचीचे आणि १६ खांबांवर स्थित असे अतिभव्य मंदिर भव्यतेच्या बाबतीत पुरातनातील एकमेव आहे. मुघलांनी दगडाच्या जाळीची निर्मिती केली हे आपल्याला सांगितले जाते, परंतु त्यांच्या कारकिर्दीच्या कितीतरी आधी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव गावातील सरस्वती व भीमेच्या संगमावर पाच मंदिरांचा संकुल आहे आणि त्यांच्या भिंती दगडी जाळीच्या आहेत. स्थापत्यशास्त्राचा हा उत्कृष्ट नमुनाच आहे. असेच एक मंदिर आडवळणावर आहे. कोल्हापूरपासून ६० किमी आणि नरसोबाच्यावाडीपासून अवघ्या ११ किमी अंतरावर असलेले आणि कृष्णेच्या काठावर वसलेले खिद्रापूर गावातील कोपेश्वर व जैन मंदिर असंख्य शिल्पांनी नटलेले आहे. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला कधी गेलात तर आडवळणावरील या स्वर्गातील भन्नाट लोकांच्या भन्नाट शिल्पकलेला नक्की भेट देता येईल. महाराष्ट्राच्या मध्ययुगीन कालखंडात अंबरनाथमधील शिवमंदिर हे शिल्पपरंपरेचे आरंभस्थान मानण्यात येते. इस १०३० ते १०४० साली शिलाहार राजवटीत बांधलेले मराठा शैलीत महाराष्ट्राचे प्रतिबिंब दर्शवणारे हे मंदिर विलक्षण आहे. महाराष्ट्राचा वारसा, संस्कृतीची ओळख सांगणारा आणि मानबिंदू जपणारा व आपण आपल्या आयुष्यात एकदातरी पहावा, असा हा ठेवा आहे.

राजसत्तांनी केलं समृध्द 
या आपल्या महाराष्ट्रावर सातवाहन, वाकाटक, शिलाहार, राष्ट्रकूट अशा बलाढ्य राजसत्तांनी राज्य केले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र समृद्ध झाला तसेच संस्कृतीची ओळख दिली ती या राजसत्तांनी! एकापेक्षा एक लेणीस्थापत्य आणि काहीसे उशिरा सुरु झालेले मंदिरस्थापत्य खऱ्या अर्थाने विकसित झाले आणि आजही त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा आपल्याला सांगत आहेत.

येथे रोवली स्वराज्याची मूहूर्तमेढ
हा महाराष्ट्र जसा लेण्यांचा, मंदिरांचा तसा हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा! ज्यावेळी या पुरातन मंदिरांवर व त्यातील देवांवर यवनी संकट आले तेव्हा तेव्हा त्यांनी तलवारीच्या व मावळ्यांच्या बळावर देव, देश आणि धर्म वाचवला आहे. महाराष्ट्राचे पर्यटन कधीही गडकिल्ल्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पराक्रमाचा वास, अभिमानाची शान आणि उत्तुंग गौरवास्पद कामगिरी करणारे हे गड म्हणजे महाराष्ट्रातील जणू काही तिर्थक्षेत्रच! स्वराज्याची पहिली राजधानी तसेच छत्रपती शिवाजी महाराज तब्बल १६ वर्ष जिथे राहिले त्यांचे निवासस्थान, गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजे राजगड! आजच्या काळातील अभियंते जिथे स्थापत्य पाहताना आश्चर्य व्यक्त करतात. मोठे मोठे दगड एकावर एक कसे ठेवले असतील याचा विचार करत राहतात. प्रचंड वारा, मुसळधार पाऊस आणि रखरखतीत उन्हात अभिमानाने छाती फुलून असलेला तीन तीन माच्या उरावर बाळगणारा हा विस्तीर्ण असा राजगड पहायला विदेशी लोकंसुद्धा हजेरी लावतात. असाच शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राज्याभिषेकाचा सोहळा याचि डोळा पाहणारा आणि मनाला चटका लावणारा क्षण म्हणजे शिवरायांचा अंतिमसोहळासुद्धा पाहणारा रायगड म्हणजे येथील इतिहास जागवणाऱ्या मंडळींचे तिर्थक्षेत्रच! गडावरील व्याडेश्वर महादेवाचे मंदिर, जगदीश्वराचे मंदिर, ती नागमोडी वळणे घेत गेलेली तटबंदी व बलाढ्य असा महादरवाजा आणि वाघ दरवाजा आजही पाहताना आणि त्यांच्या बांधकामशैलीचा अंदाज घेताना डोकं सुन्न होते. असा हा रायगड एकदा तरी पहावाच, असा आहे. थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आणि त्याच्या पायथ्याला असलेला जावळीचा रखवालदार, शिवरायांनी पायापासून बांधकामकेलेला महाराष्ट्रातील एकमेव डोंगरी गड, जिथे स्वराज्यावरील चालून आलेले बलाढ्य आक्रमण शिवरायांनी थोपवले त्याचा मुक साक्षीदार म्हणजे प्रतापगड! हा गड पाहताना अभिमानाने ऊर भरून येतो. पर्यटनाला अभ्यासाची जोड देणारे असे कितीतरी किल्ले आज महाराष्ट्रात आहेत. 

राष्ट्र निर्माण करण्याची ताकद असलेले हे भारतातील एकमेव राज्य आहे. गड, पुरातन मंदिरे, लेण्यांनी सजलेला हा महाराष्ट्र पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेलेले महाराष्ट्राला दिशा देणारे महापुरुषांची कीर्ती विदेशातसुद्धा आहे आणि म्हणूनच असंख्य विदेशी पर्यटक इथे नेहमीच येत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक असे कितीतरी बलाढ्य महापुरुष या महाराष्ट्रात घडले. अवघ्या भारतात पहिला चित्रपट साकारणारे दादासाहेब फाळकेसुद्धा इथलेच! हा आहे महाराष्ट्राच्या पवित्र मातीचा गुण! ही शिकवण आहे महाराष्ट्राची! इथे होणाऱ्या आदरातिथ्याच्या प्रेमाचे गोडवे सातासमुद्रापार गायले जातात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com