

Maharashtra Drought Notification
esakal
अमरावती : ‘‘अमरावती विभागात सर्व जिल्ह्यांत दुष्काळाची झळ पोचली आहे. यामुळे पिके संकटात आली आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळसंहितेतील ट्रिगर वनच्या आधारे दुष्काळग्रस्त भागाचा समावेश असलेली अधिसूचना शुक्रवारी (ता. २५) काढली जाईल, ’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राची वाट पाहणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
वाशीम येथील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, वाशीमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासमवेत अमरावती विमानतळावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत करण्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाकडून तातडीने मदत देण्यात येईल.
तसेच केंद्राच्या मदतीसाठी आवश्यक असणारे पंचनामे आदी प्रक्रिया करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल. शेतकऱ्यांना मदतीचा आदेश तातडीने काढणे गरजेचे आहे. यातून काही भाग वगळला गेलेला असण्याची शक्यता असल्याने तिसऱ्या ‘ट्रिगर’मध्ये वगळलेल्या भागाचा समावेश करण्यात येईल. सर्वच भागांत मोठ्या प्रमाणावर दुष्काळ असल्याने मदतीची कारवाई करण्यात येणार आहे. चाराटंचाई, पाणीटंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागणार आहे. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, यासाठी थेट मदत करण्यात येईल. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध
असलेल्या पाण्यावर पिके घेण्याबाबत तपासणी करण्यात येईल. रब्बी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. तसेच, जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. सर्वत्र पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारने मदतीचे धोरण आखले आहे. बँकांना कर्ज द्यावेच लागेल राज्य सरकारने कर्जमाफी केली असून कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.
कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावेच लागेल. त्यासोबतच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल. यासाठी लवकरच नोंदणी सुरू केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.
कापणी आधारावर शेतकऱ्यांना मदत : भरणे सिन्नर (जि.नाशिक) : पीक कापणी आधारावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. याशिवाय लवकरच ट्रिगर लागू होणार असून सुटी असली तरी अधिकारी, कर्मचारी कामावर राहून त्यासाठी काम करणार आहेत. दोन ते तीन दिवसात अधिसूचना काढून मदत जाहीर केली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिले. धोंडवीरनगर येथे प्रकाश करडग यांच्या सोयाबीन शेतातील स्थितीची पाहणी मंत्री भरणे यांनी गुरूवारी केली. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती भरणे यांनी घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. भरणे यांनी पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले असल्याचे सांगितले. निसर्गाच्या या संकटात सरकार शेतकऱ्यांसोबत असून विविध योजनांतून शेतकऱ्यांना कशापद्धतीने योजनांचा लाभ देता येईल. यालाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आटलेल्या साठ्यांतील गाळ काढणार दुष्काळाच्या काळात रोजगार निर्मितीबरोबरच भविष्यातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी आटलेल्या जलसाठ्यांमधील गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणात करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. या कामातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होईल. त्याचबरोबर जलसाठ्यांची साठवण क्षमता वाढल्यामुळे भविष्यात थोडा पाऊस झाला तरी अधिक पाणी साठविता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.