Vidhan Sabha 2019 : हे सरकार शेतकरीविरोधी - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

गडकरींची स्तुती
नितीन गडकरी यांनी नागपूर व परिसरात केलेली कामेच केवळ दिसतात. इतर कुठलेही काम केंद्र किंवा राज्य शासनाने केलेले असे दिसत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कामांची स्तुती केली. मुख्यमंत्री व अर्थमंत्री विदर्भातील असतानाही विदर्भातील रस्त्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे ‘खड्डेयुक्त रस्ता’ असे धोरण सरकारचे असावे, असेही पवार या वेळी म्हणाले.

विधानसभा 2019 : हिंगणघाट (जि. वर्धा) - विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगारविरोधी असून, उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावीत आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज येथे केला.

हिंगणघाट येथील गोकुलधाम मैदानावर आयोजित निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, ‘‘या देशातील ७० टक्‍के लोक हे शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. आज मुंबईसारख्या महानगरातील गिरणी उद्योग बंद करून त्या ठिकाणी चाळीस मजली इमारती उभ्या होत आहेत. हेच षड्‌यंत्र हिंगणघाटसारख्या शहरातही राबविण्यात येणार आहे. राज्यातील शेती अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झालेली असून, औद्योगीकरणही पूर्णतः बंद पडलेल्या अवस्थेत आहे.’’

‘बेरोजगारांच्या हाताला काम नाही. विकासाच्या नावावर सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू आहे. देशात जिथे-जिथे भाजपचे राज्य आहे, त्या त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे, स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचे शहर असलेले नागपूर हे गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर आहे. राज्य तुमच्या हातात दिले; परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील एकाही गावाचा रस्ता ठीक नाही. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. लोकांचे आर्थिक जीवनमान सुधारवायचे आहे. त्यासाठी कारखानदारी नव्याने सुरू करून शेतीला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे, तरच तरुण पिढीचे भविष्य उज्वल होईल,’’ असे पवार म्हणाले.

भीक घालणार नाही...
महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली; परंतु त्याविषयी कोणती उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही. केवळ आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी त्यांच्यावर खोटे खटले दाखल करण्याचे काम सरकार करत आहे. मी कोणत्याही राज्य मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा सभासद किंवा संचालक नसतानाही माझ्यावर खोटा गुन्हा नोंदविला, ही दडपशाही आहे; परंतु या दडपशाहीला मी भीक घालणार नाही, अशी गर्जना शरद पवार यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 government farmer oppose sharad pawar politics