मध्यवर्ती बँक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का, आता लक्ष अध्यक्ष निवडीकडे

mahavikas aghadi candidate won central bank election in yavatmal
mahavikas aghadi candidate won central bank election in yavatmal

यवतमाळ : सहकार क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या व तब्बल 12 वर्षांनंतर झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल अपेक्षेनुसार महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. मात्र, मध्यवर्तीत घुटमळत असलेल्या प्रस्थापित प्रमुख उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आता नवनियुक्त अध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता लागली आहे.

जुन्या संचालक मंडळाला विविध कारणाने 13 वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राज्य करता आले. मार्च महिन्यात होणारी निवडणूक कोरोना संसर्गामुळे लांबणीवर पडली. त्यानंतर निवडणूक जाहीर झाल्यावर सहकारक्षेत्रातील वातावरण चांगलेच तापले. राज्याच्या राजकारणात सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांनी महाविकास आघाडीची मोट बांधून निवडणूक लढली. तर, भाजपने असंतुष्टांना जवळ करीत शेतकरी सहकार विकास आघाडीच्या माध्यमातून दंड थोपटले. पक्ष व सहकार क्षेत्रात दबदबा असताना राजकीय नेत्यांनी उमेदवारी देण्यात आखडता हात घेतल्याने अपक्ष दावेदारी केली. प्रत्यक्ष मतदानासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी मोठ्या मनाने मतदारांना खुश केले. त्याचे फलितही उमेदवारांना मिळाले. जुने 11 संचालक बँकेत निवडून आले आहे.

विशेष म्हणजे नवीन दहा चेहऱ्यांनाही बँकेत राजकारण करण्याची संधी मिळाली. माजी अध्यक्ष विनायक ऐकरे, डॉ. रवींद्र देशमुख, नरेंद्र बोदकुरवार, बाबासाहेब गाडे पाटील यांना पराभवाचा जबर धक्का सहन करावा लागला. बँकेत ऍड. शंकर राठोड यांनी चौथ्यांदा, चंद्रकांत वानखेडे तिसऱ्यांदा, तर माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी आमदार प्रकाश पाटील देवसकर, माजी अध्यक्ष मनीष पाटील, अमन गावंडे यांनी एंट्री केली आहे. महाविकास आघाडीचे सर्वाधिक संचालक निवडून आल्याने त्यांचाच अध्यक्ष होणार, हे निश्‍चित आहे. मात्र, अध्यक्ष कोण, यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर एकमत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कर्मचाऱ्यांत 'कही खुशी-कही गम' -
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखले जाते. येथील राजकारण अनेकदा कर्मचाऱ्यांभोवती घुटमळले जाते. नियुक्तीपासून ते बदलीपर्यंत संचालकांसोबत वैयक्तिक हित जोपासले जाते. प्रस्थापितांना मतदारांनी बाहेरचा रस्ता दाखविला. तर, जुन्या संचालकांना पुन्हा एकदा संधी मिळाली. नवीन चेहरेही आले आहेत. एकूणच चित्रामुळे कर्मचारीवर्गांत "कही खुशी-कही गम'चे चित्र बघावयास मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com