esakal | तुम्ही घरी थांबा, आम्ही सुरळीत वीजपुरवठा करू; आपत्तीतही ‘महावितरण’ सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitaran.jpg

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

तुम्ही घरी थांबा, आम्ही सुरळीत वीजपुरवठा करू; आपत्तीतही ‘महावितरण’ सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून राज्यासह अकोला, वाशीम आणि बुलडाणा जिल्हा लाॅकडाऊन करण्यात आले असतांना या काळातही महावितरणची अकोला परिमंडळाची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. आरोग्याची योग्य खबरदारी घेऊन अभियंता व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य देत कर्तव्य बजावत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदीचा आदेश तसेच ‘घरुनच काम’ (वर्क फ्रॉम होम) चा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे महावितरणकडून विविध उपाययोजनांसह वीजपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवेसाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांत 5 टक्के उपस्थितीची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी प्रामुख्याने अभियंता आणि तांत्रिक कर्मचारी (जनमित्र) सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज आहेत.

महत्त्वाची बातमी - ‘मी समाजाचा शत्रू आहे’, बाहेर फिरणऱ्यांच्या हातात पोलिसांनी दिले फलक!

प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तसेच कार्यालयप्रमुखांना मास्क, लिक्विड हॅण्डवॉश, सॅनेटायझर उपलब्ध करूनध देण्यात आले आहेत. यासोबतच दुरुस्तीच्या कामासाठी जाताना अभियंता व जनमित्रांनी स्वतःचे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो तत्परतेने पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही गंभीर तांत्रिक बिघाडामुळे वेळ लागल्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाकडून करण्यात येत आहे.

महावितरणकडून सोमवार (दि. 23) पासून वीजबिलांची छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत छपाई सुरु होईपर्यंत वीजग्राहकांना वीजबिल मिळणार नाहीत. तसेच वीजमीटरचे रिडींग सुद्धा घेण्यात येणार नाही. मात्र महावितरणच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपवर वीजबिल उपलब्ध आहेत. यासोबतच महावितरणकडे मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड केलेल्या वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबिलाची माहिती पाठविण्यात येणार आहे. महावितरणच्या कन्झुमर पोर्टलवरून किंवा मोबाईल ॲपमधील लॉगीन वीजग्राहकांना मीटरचे रिडींग अपलोड करण्याची सोय आहे. मीटर रिडींग न घेतलेल्या वीजग्राहकांना सरासरी वीजबिल पाठविण्यात येणार आहे. त्यापुढील कालावधित वीज ग्राहकांना योग्य रिडींग घेतल्यानंतर अचूक वीजबिल देण्यात येईल.

ग्राहकांनी ऑनलाईन वीज बिल भरून सहकार्य करावे
महावितरण कोव्हीड-19 या विषाणूच्या संकट काळातही अखंडित वीज पुरवठा करण्यास बांधिल आहे. पण,या काळात वीज ग्राहकांनी मोबाईल एप तसेच महावितरणच्या संकेत स्थळाला भेट देऊन ऑनलाईन वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाकडून करण्यात येत आहे.

वीज पुरवठ्यासाठी करा कॉल
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत वीजग्राहकांनी वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी किंवा अन्य सेवेसाठी महावितरणच्या कार्यालयात येऊ नये. किंबहुना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडूच नये. वीजपुरवठा खंडित झाला असल्यास किंवा अन्य महत्वाची तक्रार किंवा माहिती देण्यासाठी महावितरणच्या स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या आणि आठवड्यातील 24×7 सुरू असणाऱ्या अकोला जिल्‍ह्याकरिता 7875763339, बुलडाणा 7875763485, वाशिम 7875763276 या जिल्हा दैनंदिन सनियंत्रण कक्षासोबत अकोला परिमंडळाच्या उपलब्ध असणाऱ्या 7875763350 क्रमांकावर संपर्क साधावा, याचबरोबर महावितरणच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर काॅल करावे असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

loading image