सुरक्षित मातृत्वासाठी "माहेरघर' 

सुरक्षित मातृत्वासाठी "माहेरघर' 

नागपूर - राज्यात गर्भवती राहणाऱ्या एकूण महिलांपैकी 30 टक्के माता प्रसूतीदरम्यान जोखमीच्या उंबरठ्यावर उभ्या असतात. त्यापैकी प्रसूत होणाऱ्या दर लाख गरोदर मातांमध्ये 61 माता दगावतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने "माहेरघर' ही अभिनव योजना सुरू केली आहे. राज्यातील अतिदुर्गम भागांतील सहा हजार महिलांना सुरक्षित मातृत्व माहेरघरातून मिळाले आहे. 

प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूस अतिरिक्त रक्तस्त्रावाचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना केल्यास महाराष्ट्र मातामृत्यूमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष असे, की आदिवासी बहुल गावखेड्यांपासून तर तांडा, नक्षलभागातील आदिवासीपर्यंत पोहोचण्याची साधनसुविधा नसल्यामुळेही माता व बालमृत्यूंमध्ये वाढ होत आहे. 

पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर, अमरावती (मेळघाट, धारणी, चिखलदरा), यवतमाळ, नंदुरबार या भागात 91 माहेरघर तयार करण्यात आली. या माहेरघरात मागील दोन वर्षांत 6,068 महिलांना सुरक्षित मातृत्व लाभले आहे. प्रत्येक वर्षी दोन हजारांवर महिलांना लाभ मिळाला. सुरक्षित मातृत्वाच्या सोयी प्रदान करताना महिलांना बाळंतपणासाठी आरोग्य केंद्राच्या बाजूला असलेले "माहेरघर' तयार करण्यात आले. गर्भवती महिला शेवटच्या तपासणीसाठी आल्यानंतर तिची प्रसूती गुंतागुंतीची होण्याचे संकेत दिसताच तिला माहेरघरामध्ये भरती करून घेतले जाते. राज्यात प्रत्येक माहेरघरात दोन खाटांची सोय आहे. गर्भवती महिलेसोबत असलेल्या व्यक्तीच्या भोजनासह आवश्‍यक सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येतात. 

नातेवाइकाला 100 रुपये मोबदला 
गर्भवती महिलेसोबत सहायक म्हणून राहणाऱ्या महिला किंवा पुरुषाची मजुरी बुडू नये, या हेतूने दैनंदिन मजुरीचा मोबदला म्हणून दरदिवशी 100 रुपये दिले जातात. राज्यात 91 माहेरघर सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यात 13, चंद्रपूर जिल्ह्यात सात, गडचिरोली जिल्ह्यात 31, अमरावती जिल्ह्यात धारणी, चिखलदरा, मेळघाट विभागात 11, यवतमाळ जिल्ह्यात 12, नंदुरबारसह इतरही भागांत 12 माहेरघर कार्यरत आहेत. या माहेरघरातील संकल्पनेला योग्य प्रतिसाद मिळत असल्याने विदर्भात सरासरी 98 टक्के बाळंतपणे ही आरोग्य केंद्रात झाले आहेत. 

प्रथमच आई बनण्याच्या स्थितीत महिलांमध्ये मानसिक ताण वाढत जाताना दिसतो. वाढणारे वय, वेदना सहन करण्याची कमी झालेली क्षमता, स्थूलपणा हे घटक प्रसूतीसमयी गुंतागुंतीस कारणीभूत ठरतात. यामुळे माता आणि बाळाच्या जिवावर बेतणारा प्रसंग घडू शकतो. यामुळे माहेरघर ही संकल्पना आकाराला आली आहे. 
- डॉ. अर्चना पाटील, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, पुणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com