esakal | चक्क स्मशानभूमीत पार पडला दिवाळी स्नेहसंमेलन कार्यक्रम; झाडे लावून माहेरवासी संघाने जपली परंपरा 
sakal

बोलून बातमी शोधा

Maherwasi community celebrated diwali program in graveyard

यावर्षी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता या जिवाभावाच्या सोहळ्यात खंड पडू नये म्हणून माहेरवासी संघाच्या वतीने मोझरी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करून हा स्नेहमिलन सोहळा पार पडला. 

चक्क स्मशानभूमीत पार पडला दिवाळी स्नेहसंमेलन कार्यक्रम; झाडे लावून माहेरवासी संघाने जपली परंपरा 

sakal_logo
By
प्रशिक मकेश्वर

तळेगाव ठाकूर (जि. अमरावती) ः नोकरी निमित्ताने गावापासून कोसो दूर राहणाऱ्या माहेरवासी लोकांसाठी एक जिव्हाळ्याचे स्नेहमिलन म्हणून मागील ५५ वर्षांपासून मोझरी येथील माहेरवासी संघाच्या वतीने स्नेहमिलन सोहळा हा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेला साजरा होतो. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता या जिवाभावाच्या सोहळ्यात खंड पडू नये म्हणून माहेरवासी संघाच्या वतीने मोझरी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करून हा स्नेहमिलन सोहळा पार पडला. 

या अनोख्या स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता शंकर ढवळे, प्रमुख अतिथी सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता रमेश ढवळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मोझरीचे माजी सरपंच चंद्रकांत वडस्कर उपस्थित होते. वृक्षारोपणाला मोझरी येथील हिंमत उमप, सुरेश ठाकूर, रमेश बोबडे, गणेश उमप, शफीक शहा, नीलेश वडस्कर, अनंत बेले आदी उपस्थित होते. आभार दिनेश खराटे यांनी मानले. 

सविस्तर वाचा - 'आठ महिन्यांपासून मिळेल त्यावर पोट भरलंय, दिवाळीच्या दिवशी ऑर्डर मिळताच पोटभरून जेवलो'

नोकरीनिमित्त वर्षभर गावाबाहेर राहणारे माहेरवासी दिवाळीनिमित्त आपल्या मूळ गावी येतात. त्यामुळे हे सर्व माहेरवासी एकत्र येऊन एकमेकांच्या भेटीगाठी व्हाव्यात, एकमेकात संवाद व्हावा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून माहेरवासी संघाची ५५ वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली होती.

 त्याच पार्श्वभूमीवर ५५ वर्षांपासून माहेरवासी संघाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, अंधश्रद्धा निर्मूलनसारखे कार्यक्रम राबवले जातात. परंतु यावर्षी कोरोना संसर्ग लक्षात घेता माहेरवासी संघाने रविवारी (ता.१५) मोझरी येथील स्मशानभूमीत वड, उंबर, चिंच, जांभुळाची झाडे लावून स्नेहमिलन सोहळा पार पडला. 

अधिक माहितीसाठी - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक

इतर गावांनी प्रेरणा घ्यावी 
आमच्या गावात सुरू असलेला माहेरवासी संघ महाराष्ट्रात फक्त मोझरीत आहे. ही संकल्पना जर प्रत्येक गावाने राबवली तर नोकरदार वर्गासाठी एक चांगले मिलन होऊ शकेल. 
- शंकर ढवळे,
माहेरवासी संघ, मोझरी.

संपादन - अथर्व महांकाळ