'आठ महिन्यांपासून मिळेल त्यावर पोट भरलंय, दिवाळीच्या दिवशी ऑर्डर मिळताच पोटभरून जेवलो'

band artist are happy because of getting order in diwali
band artist are happy because of getting order in diwali

नागपूर : कोरोनाच्या दहशतीमुळे गेली आठ महिने लग्नसराई बंद होती. यामुळे बँड वाजवण्यासह सनईच्या सुरातून मंगलमयी वातावरणात आनंद देणारा वाजंत्री व्यवसाय लॉकडाउन झाला होता. वाजंत्री कलाकारांचा रोजगार बुडाला. वाद्य वाजवलं की, चुल पेटते. हातावरचं पोट असल्याने पैसा नव्हता. अक्षरशः उपासाचे फाके अनुभवले. आड्याकडं पाहून रात्र काढली. आठ महिन्यानंतर पहिल्यांदा लग्नात वाद्य वाजवण्याची ऑर्डर मिळाली. तो दिवस होता दिवाळीचा. दिवाळीच्या दिवशीच लक्ष्मी हातावर आली. अ‌ॅडवान्स मिळताच मिठाईचे दुकान गाठले. आईबाबांना गोडधोड खाऊ घातलं, त्या दिवशी पोटभर जेवण केलं. हे अनुभव सांगताना ड्रम, कच्ची वाद्य यावर हात फिरवताना पंचेविशीतील तिन्ही कलाकारांचे डोळे पाणावले. 

कोरोनाच्या महासंकटात जगताना मृत्यूपेक्षा भयावह चित्र नजरेसमोर येत होते. मोहित या दिलदार तरुणाच्या लग्नात मनसोक्त ड्रम, कच्ची वाद्य वाजवले. वाजंत्री व्यवसायात स्थिरावलेल्या या पंचेविशीतील तरुणांची नावे पवन खडसे, राहुल गवई आणि गणेश गवई. ही सारी मातंग समाजाची मुले. मातंग शिकू लागला आहे. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक तरुण शिक्षणापासून दूर आहेत. काही तरुणांनी पारंपारिक कलेचा वारसा जपण्यासाठी बँड व्यवसायात स्वतःला झोकून दिले आहे. वाद्य कलांना जन्म देणाऱ्या या समाजाचा अलिकडे विकास होत असला तरी कलेचे संगोपन करण्यासाठी हातातून वाद्य त्यांनी सोडले नाही. कोरोनाच्या या काळात वाजंत्री कलाकाराचा रोजगार बुडाला असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हजाराहून अधिक कुटुंबाचा उदरनिर्वाह या वाजंत्री कलेवर अवलंबून आहे. आठ महिने यांच्या पुनर्वसनासाठी कोणीही धावून आले नाही. विशेष असे की, मातंग समाजातील या वाद्य वाजवणाऱ्यांना कलाकार म्हणून दर्जा देण्यात आला नाही. यामुळे शासनाच्या अनुदानापासून हे वंचित राहिले आहेत. 

राज्यात मातंग समाजात वाजंत्री व्यवसाय करणाऱ्यांची लोकसंख्या लाखाच्यावर आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी "अच्छे दिन' असतात. मात्र, मार्चमध्ये कोरोनाची साथ सुरू झाली आणि वाजवणारे हात थांबले. कुटुंबाला जगविण्यासाठी वाजवताना होणाऱ्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना असह्य झाल्या होत्या, असे पवन सांगतो. कलेतून कुटुंबाचे पोट भरत होते. तीन-चार महिने व्यवसाय केला की, उर्वरित ९ महिने कुटुंबाचा गाढा चालविण्यासाठी मदत होत असे. मात्र, मागील आठ महिन्यात वाजवण्याची एकही ऑर्डर मिळाली नाही. यामुळे मागील दोन महिने अनेक कलाकारांनी रस्त्यावर भाजीपाल्याचे दुकान थाटले, तर कोणी मजुरीचे काम करत होते. परंतु, मजुरीचे काम करता येत नव्हते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

पुढील पाच महिने वेदनादायी -
वाजंत्री व्यवसाय सुरू झाला. मात्र, लग्नसराईचे दिवस नाहीत. महिन्यातून एक किंवा दोन वेळा हाताला काम मिळणार. उर्वरित दिवस काम मिळणार नाही. पुढील पाच महिने या व्यवसायावर संकट राहणार आहे. त्यामुळे वाजंत्री व्यवसाय करणाऱ्यांना पुढील मार्च, एप्रिलपर्यंत भुकेच्या वेदना सहन करतच जगावे लागणार. या वेदना लपविण्यासाठी मद्याला जवळ करीत आहेत. काही सावकाराकडे हात पसरत आहेत. समाजातील लोकांनीच आमचा व्यवसायाला जगवण्यासाठी हातभार लावावा, असे पवन, राहुल आणि गणेश म्हणाला. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com