अर्बनचे अध्यक्ष, संचालकांचा भाजप प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

भंडारा : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नामांकित असलेल्या दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या अध्यक्षांसह सात सदस्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री परिणय फुके यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेतला. या अनपेक्षित प्रवेशनाट्यामुळे जिल्ह्याचे राजकारण व सहकार क्षेत्राला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपवासी झालेल्यांमध्ये या क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. भविष्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

अर्बन ही भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील अग्रणी बॅंक आहे. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा या बॅंकेच्या शाखा आहेत. त्यामुळे येथील संचालक मंडळावर राजकीय प्रभाव आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मर्जीतील देवरी निवासी महेश जैन हे अर्बन बॅंकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. महेश जैन व प्रफुल्ल पटेल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वितुष्ट आले होते. त्यामुळे जैन हे भाजपच्या संपर्कात होते. अखेर जैन यांनी राष्ट्रवादीला रामराम करून आपल्या सात संचालकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यात राष्ट्रवादी समर्थित जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये, हिरालाल बांगडकर, लीलाधर वाडीभस्मे, उद्धव डोरले, पांडुरंग खाटिक, उदय मोगलवार, कविता लांजेवार यांचा समोवश आहे. यांना भाजपवासी करण्यात भाजपचे जिल्हा संघटनमंत्री वीरेंद्र अंजनकर, आमदार संजय पुराम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
भाजपला लाभ
अर्बन बॅंकेच्या संचालक मंडळावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. परंतु, या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पडले. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रभावालासुद्धा मोठा हादरा बसला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. दोन महिने उलटत नाही तोच या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. एका पाठोपाठ एक अशा घडणाऱ्या बदलांमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला उतरती कळा लागल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या खेम्यातील हे महत्त्वाचे शिलेदार भाजपमध्ये ओढून आणल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahesh jain joined BJP