साहेब, आमच्या जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा हो, ४२ गावांच्या गावकऱ्यांनी केली मागणी

मिलिंद उमरे
Thursday, 22 October 2020

जिल्ह्यातील दारूबंदी उठवून विक्री सुरू झाल्यास गावागावांत देशी, विदेशी दारू शिरकाव करेल. गावातील स्त्रिया, तरुण मुलांचे शारीरिक व आर्थिक शोषण व नुकसान होईल. जिल्ह्यातील दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी तोडसा पारंपरिक इलाका गोटूल समितीने ठराव घेतला आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात १९९३ मध्ये लागू झालेली दारूबंदी उठविण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी एटापल्ली तालुक्‍यात तोडसा पारंपरिक इलाका गोटूल समितीने ठराव घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. साहेब, आमच्या जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा, अशी कळकळीची मागणी समितीत समाविष्ट ४२ गावांच्या गावकऱ्यांनी केली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठविलेल्या पत्रात गावकऱ्यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. मात्र आदिवासी गावे दारूविक्री मुक्त आहेत. याचा फायदा गावातील लोकांना झाला. गावात व्यसनाधीनता वाढली नाही. गावांची परिस्थिती सुधारली. दारूबंदीचे एवढे लाभ असतानासुद्धा सध्या दारूबंदी उठविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जिल्ह्यातील दारूबंदी उठवून विक्री सुरू झाल्यास गावागावांत देशी, विदेशी दारू शिरकाव करेल. गावातील स्त्रिया, तरुण मुलांचे शारीरिक व आर्थिक शोषण व नुकसान होईल. गावाचा विकास खुंटेल. त्यामुळे ग्रामसभांनी दारूविक्री बंदीचे निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी तोडसा पारंपरिक इलाका गोटूल समितीने ठराव घेतला आहे.

अवश्य वाचा : श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास  

मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

समितीच्या ४२ गावांतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आले. जिल्ह्यातील दारूबंदी न उठवता अधिक कडक करा, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू असल्याची कुणकूण लागताच मुक्तिपथ अभियानाद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. अनेक समाजसेवक, स्वयंसेवी संस्था व गावांतील नागरिकांनी जिल्ह्यातील दारूबंदीचे समर्थन केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातत्याने पत्रे लिहिण्यात येत आहेत.

पोलिस, गाव संघटनेची राहणार नजर

भामरागड नगरपंचायतअंतर्गत येणाऱ्या हेमलकसा वॉर्डात पोलिस विभाग, मुक्तिपथ व गाव संघटनेची बैठक तहसीलदार कोपुलवार यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. बैठकीत गावाच्या विकासकामांसोबतच सणासुदीच्या काळात बाहेरून तालुक्‍यात शिरकाव करणाऱ्या अवैध दारूला प्रतिबंध करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यामुळे तालुक्‍यात येणाऱ्या दारू तस्करांवर पोलिस विभाग व गाव संघटनेची नजर राहणार आहे.

जाणून घ्या :  गडचिरोली जिल्ह्यातील इंद्रावती नदीत प्रवासी नाव बुडाली; १३ जण सुरक्षित अनेक जण बेपत्ता

पोलिस निरीक्षकांच्या अध्यक्षतेत बैठक

भामरागडचे पोलिस निरीक्षक संदीप भांड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत गावातील स्वच्छता, विकासकामे व व्यसनमुक्त गाव या संदर्भात चर्चा करण्यात आली. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून दिवाळी, दसरा पुढे आहे. त्यामुळे बाहेरून तालुक्‍यात व शहरात दारूची तस्करी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गाव संघटनेनेदेखील सतर्क राहून पोलिस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप भांड यांनी केले आहे. यावेळी हेमलकसा ग्रामसभेचे अध्यक्ष रामलू सडमेक, मुक्तिपथ तालुका संघटक चिन्नू महाका, प्रेरक आबिद शेख उपस्थित होते.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maintain alcohol ban in Gadchiroli district, demand of villagers of 42 villages