esakal | अरे! हे तर शेतकऱ्यांचा नव्हे व्यापाऱ्यांच्या मक्याला भाव देण्याचे मनसुबे, काय करावे हा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

maize in buldana district.jpg

एकीकडे शासनाने मका पिकाला आधारभूत किंमत सतराशे साठ रुपये प्रतिक्विंटल ठरवून देत असताना बाजारात आजरोजी हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास शेतकऱ्यांना भाव मिळत आहे.

अरे! हे तर शेतकऱ्यांचा नव्हे व्यापाऱ्यांच्या मक्याला भाव देण्याचे मनसुबे, काय करावे हा प्रश्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदुरा (जि.बुलडाणा) : यावर्षी पावसाळा चांगला झाला असतांना विहिरींना मुबलक पाणी राहिल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पीक म्हणून मका पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. हे पीक सध्या काढणीला आले असून, बाजारात विक्रीला नेले असता याची खासगी व्यापारी मातीमोल भावात खरेदी करून शेतकऱ्यांना लुटत आहेत.

एकीकडे शासनाने मका पिकाला आधारभूत किंमत सतराशे साठ रुपये प्रतिक्विंटल ठरवून देत असताना बाजारात आजरोजी हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास शेतकऱ्यांना भाव मिळत आहे. जेव्हा केव्हा ही शासनाची आधारभूत किमतीनुसार मक्याची खरेदी सुरू होईल तेव्हा शेतकऱ्यांचा नव्हे व्यापाऱ्यांच्या मक्याला भाव देण्याचे मनसुबे शासनाचे असल्याने आधारभूत किमतीनुसार खरेदीला मुहूर्त देण्याचे टाळले जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सध्या  शेतकऱ्यांत उमटत आहेत.

आवश्यक वाचा - साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असता तर, आमच्यावर ही वेळ आली नसती; चक्क पोलिस कर्मचाऱ्याने देवेंद्र फडणवीस
यांच्यासमोर...

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी भावाने धान्य विकावें लागू नये म्हणून शासनाने मक्याची आधारभूत किंमत सतराशे साठ रुपये प्रति क्विंटल ठरवून दिली आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी पिक खरेदीचा निर्णय घेतला आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून ही खरेदी तत्काळ सुरू होणार अशा बातम्या झळकल्याने शेतकऱ्यांना हमीभावाच्या आशा लागुनही चुकल्या असतांना या खरेदीला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही.

सध्या शेतकऱ्यांचा रब्बीचा मका तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून धान्य साठवणुकीची कोणतीही व्यवस्था शेतकऱ्याकडे नसल्याने शेतात तयार झालेला मका सरळ मार्केटला पाठविला जात आहे. मार्केटमध्ये व्यापारी वेगवेगळी लॉगडाउनची कारणे दाखवत मनमानी भावातून शेतकऱ्यांना लुटून हा मका स्वतःच्या गोडाऊनला लॉक करत आहेत.

जेव्हा केव्हा हीच शासनाची खरेदी सुरू होईल तेव्हा सर्व पिकाप्रमाणे हमीभावाचा पैसे व्यापारी यातून कमविणार आहेत.सद्या पेरणीचे संकेत हवामान खात्याकडून प्राप्त होत असल्याने शेतकरी शेती मशागतीच्या व बी बियाणे,खते जुळविण्यासाठी मिळेल त्या भावात सर्वच धान्य मार्केटमध्ये विक्रीला आणत असताना भावात झालेली घसरण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

व्यापाऱ्यांचाच यात फायदा
निसर्गाचा लहरीपणा व शासनाचे शेतकऱ्यांबाबत पूर्ण चुकीचे धोरण असल्याने पिकविलेले मालही विकता येईल की, नाही हे सांगता येत नाही. कोणतेही पीक असो शासनाने हमी भावाची खरेदी ही शेतकऱ्याच्या घरातील माल विकल्यानंतर सुरू होत असल्याने व्यापाऱ्यांचाच यात फायदा होतो.
- शांताराम जुनारे, शेतकरी, तांदुळवाडी