मित्राचे लग्न आटोपले, नंतर परतीच्या मार्गावर घडले असे... 

सचिन शिंदे 
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

या महामार्गाचे काम सुरू असल्याने एकाच मार्गावर रहदारी सुरू आहे. त्यातच वाहने भरधाव चालत असल्याने अशा दुर्घटना होत असल्याचे सांगितले जात आहे.

आर्णी (जि. यवतमाळ) : मित्राचे लग्न आटोपून घराकडे परत जाणाऱ्या तीन तरुणांच्या कारला भीषण अपघात झाला. यात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात रविवारी (ता. 10) दुपारी नागपूर-तुळजापूर महामार्गावर सुकळी (ता. आर्णी) गावाजवळ झाला. 

कारचालक ठार 
प्रेम उत्तम निरंजने (वय 32) असे अपघातात ठार झालेल्या कारचालकाचे नाव आहे. महागाव तालुक्‍यातील अंबोडा येथे मित्राच्या लग्नासाठी चंद्रपूर येथील बाबूपेटमध्ये वास्तव्यास असलेले प्रेम उत्तम निरंजने (वय 32), डॉ. संजय विठ्ठल जांडेकर (वय 32) व विनय पंजाब मोरे (वय 30) हे तिघे आज रविवारी (ता.10) सकाळी आपल्या स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एम.एच. 34 ए.ए. 1445) आले होते. लग्न लावून घरी परत जात असताना सुकळी गावाजवळ भरधाव जात असता समोरून येणारे अचानक वाहन आल्याने कारवरील नियंत्रण हुकले व कार रोडच्या कडेवरून घसरून उलटली. 

जखमी ग्रामीण रुग्णालयात 
या गंभीर अपघातात कारचालक प्रेम उत्तम निरंजने हे जागीच ठार झाले व इतर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना महामार्ग पोलिसांनी 102 या रुग्णवाहिकेने आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या महामार्गाचे काम सुरू असल्याने एकाच मार्गावर रहदारी सुरू आहे. त्यातच वाहने भरधाव चालत असल्याने अशा दुर्घटना होत असल्याचे सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major car accident at arni of yavatmal district