पोलिस दलात लवकर मोठे फेरबदल?

अनिल कांबळे - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

नागपूर - शहर पोलिस दलात लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. याचा फटका उपायुक्‍तांपासून, तर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना बसणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी पदाची सूत्रे हाती घेताच शहर पोलिस दलातील अनेक उणिवांवर लक्ष वेधले होते.

नागपूर - शहर पोलिस दलात लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. याचा फटका उपायुक्‍तांपासून, तर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना बसणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी पदाची सूत्रे हाती घेताच शहर पोलिस दलातील अनेक उणिवांवर लक्ष वेधले होते.
माजी पोलिस आयुक्‍त शारदाप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले होते. यात मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. अनेक वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना ज्युनिअरच्या हाताखाली पाठविण्यात आले होते. चांगल्या अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्ष किंवा साईड ब्रॅंचला टाकले होते. "वजनदार‘ पोलिस निरीक्षकांना वाहतूक खाते व ठाणे देण्यात आले होते. पोलिस आयुक्‍त डॉ. व्यंकटेशम्‌ यांच्या लक्षात आली असून, पोलिस खात्यात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. 

 
शिस्तप्रिय व कडक पोलिस अधिकारी म्हणून डॉ. व्यंकटेशम्‌ यांची ओळख आहे. स्वबळावर पोलिस विभागातील उणिवा शोधून त्या पूर्ण करण्याची क्षमता ते ठेवून आहेत. त्यांच्याकडे असलेले अधिकारीही प्रामाणिक आणि कार्यतत्पर ठेवण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे त्यांना अधिकाऱ्यांची चमूही निर्भीड आणि निष्पक्ष हवी आहे.

अनेकांची "गुर्मी‘ उतरणार !
शहर पोलिस दलात वरिष्ठांचा वरदहस्त असल्यामुळे "आपले कुणीही बिघडवू शकत नाही‘ अशा तोऱ्यात काही अधिकारी वावरत आहेत. अनेकांनी पदासाठी वरूनच "सेटिंग‘ करून ठेवली आहे. मात्र, "नवा गडी नवा राज‘ या उक्‍तीप्रमाणे अनेकांची गच्छंती निश्‍चित आहे. उपायुक्‍त ईशू सिंधू व अभिनाश कुमारसारख्या कर्तबगार अधिकाऱ्यांना नवी जबाबदारी मिळू शकते. वाहतूक व्यवस्थेवर नाराजी असल्यामुळे वाहतूक शाखेतही मोठे बदल घडू शकतात. 

Web Title: Major changes early police forces?