शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला; अवकाळी पावसामुळे धानपिकांचे नुकसान, भारी धानपिकाच्या कडपा ओल्याचिंब

टीम ई सकाळ
Saturday, 21 November 2020

गोंदिया शहरासह तालुक्‍यात पावसाने दुपारनंतर दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात पडून असलेल्या धानाच्या कडपांना पावसापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, सालेकसा तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. देवरी, गोरेगाव, आमगाव, तिरोडा तालुक्‍यातदेखील पावसाने हजेरी लावली.

भंडारा-गोंदिया : हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार शुक्रवारी (ता. २०) पहाटे व दुपारनंतर अवकाळी पावसाने भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेच. शिवाय शेतात पडून असलेल्या भारी धानपिकाच्या कडपा ओल्याचिंब झाल्या असून, तूरपिकांनाही फटका बसला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या मध्यंतरी कुडकुडणाऱ्या थंडीला सुरुवात झाली होती. ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या होत्या. उनी कपडे परिधान केल्याशिवाय कुणीही बाहेर पडत नव्हते. मात्र, अचानक वातावरणात बदल घडून आला. दमट वातावरण निर्माण झाले. थंडी गायब झाली. हवामान बदलाचा तूर पिकांना फटका बसला आहे. लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींमध्ये सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळून येत आहेत. अशातच हवामान खात्याने तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असे संकेत दिले होते.

अधिक वाचा - ही दोस्ती तुटायची नाय : दुर्धर आजाराने ग्रस्त मित्राच्या उपचारासाठी गोळा केला साडेपाच लाखांचा निधी

त्यानुसार, शुक्रवारी पहाटेला अवकाळी पावसाने दोन्ही जिल्ह्यांत हजेरी लावली. सकाळपासून दुपारी दोनपर्यंत उसंत दिलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. भंडारा, साकोली, तुमसर, मोहाडी, पवनी या तालुक्‍यांत पावसाने अक्षरशः झोडपून काढले. लाखनी व लाखांदूर तालुक्‍यात तुरळक पाऊस झाला. साकोली तालुक्‍यातील सानगडी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भारी धानाच्या शेतात कापून ठेवलेल्या कडपा पाण्यात भिजल्या असून, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

गोंदिया शहरासह तालुक्‍यात पावसाने दुपारनंतर दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात पडून असलेल्या धानाच्या कडपांना पावसापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, सालेकसा तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. देवरी, गोरेगाव, आमगाव, तिरोडा तालुक्‍यातदेखील पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, धानाचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका संपता, संपेना अशीच दिसते.

क्लिक करा - हे उद्धव ठाकरे नव्हे तर घूमजाव सरकार; भाजपच्या दिग्गज नेत्याने केला आरोप

कोरोनाच्या सावटात अकाली संकट

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. या जीवघेण्या आजारापासून दूर राहण्याचा प्रत्येकजण अटोकाट प्रयत्न करीत आहे. हे सारे सुरळीत होत असताना जिल्ह्यांवर आता निसर्ग कोपला आहे. हलक्‍या धानाची नासाडी केल्यानंतर आता भारी धानाचीदेखील अवकाळी पावसाने नासाडी केली आहे. भारी धानाच्या कडपा शेतात पडून आहेत. एक-दोन दिवसांत मळणी झाली असती. मात्र, या पावसाने हे धानपीकही हिरावून घेतले आहे.

पावसाने आणले धान उत्पादकांच्या डोळ्यात पाणी

नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली जाते. मात्र, यंदा धान उत्पादक शेतकऱ्यावर संकटामागून संकटे ओढवू लागली आहेत. धान कंपनीचा शेवटचा टप्पा. गंजी रचून मळणी करणे इतकेच बाकी असताना आज अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. बांध्यात धानाचे पुंजके आणि आलेल्या पावसाने तोंडचा घास हिरावून घेतल्यागत परिस्थिती निर्माण झाली. अचानक आलेल्या पावसाने धान उत्पादकाच्या डोळ्यात पाणी आणले. मागील महिन्यात वादळ आणि पावसामुळे उभे धान पीक झोपून गेले होते. त्यानंतर तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव यामुळे धान पिकाचे जणू तनीसच झाली. उरले सुरले थोडेफार अरजतील, असे शेतकऱ्यांना वाटले होते. त्यामुळे धानाची कापणी करून बांध्यात पुंजके होते, मात्र गंजी रचण्यापूर्वीच अचानक बेमोसमी पावसाचे आगमन झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रोग, किडी त्याचबरोबर निसर्गाचे चक्र आदी संकटामागून संकटे शेतकऱ्यावर ओढवू लागल्याने धान उत्पादक मेटाकुटीस आला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major damage to paddy crops due to unseasonal rains