न्यायासाठी पाण्याच्या टाकीवर चढली व्यक्ती अन् उडाली प्रशासनाची तारांबळ, तब्बल ६ तास रंगले शोलेस्टाईल आंदोलन

दीपक फुलबांधे
Wednesday, 27 January 2021

शेवटी पंचायत समीतीतील वंजारी यांनी  चौकशी करण्याचे लिखित आश्वासन दिल्यानंतर तो जवळपास १० ते ११ वाजण्याच्या सुमारास खाली उतरला. तो जवळपास ५ ते६ तास पाण्याच्या टाकीवर असल्याने या वेळात मात्र प्रशासनाला व पोलिस विभागाला मोठी कसरत करावी लागली. 

मोहाडी (जि. भंडारा) : आंधळगाव येथे प्रजासत्ताकदिनी सामाजिक कार्यकर्ते किरण सातपुते यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढुन शोलेस्टाईल आंदोलन केल्याने प्रशासनाची धावपळ झाली. ग्रामपंचायतच्या कामात अनियमितता आढळून आली असून त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये प्रशासन संबंधित कर्मचाऱ्यांची पाठराखण करत असून न्याय देण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप या आंदोलनकर्त्याने केला.

हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

सातपुते नेहमी उपोषण व आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला व प्रशासनाला अनेक दिवसांपासून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. पण याकडे कोणीही लक्ष देत नव्हते. यासाठी त्याने ठोस पुरावेसुद्धा प्रशासनाला दिले होते. जेव्हा जेव्हा सातपुते याने उपोषण व आंदोलन केली तेव्हा प्रशासनाने थातुरमातुर चौकशी करुन न्याय देण्याचे आश्वासन दिले. पण त्याच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लढ्याला न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे शेवटी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशारा त्याने दिल्याने प्रशासन खळबळून जागे झाले. यासाठी पोलिस विभाग सतर्क होऊन त्याच्या मागावर लागले. पण शेवटी तो पोलिसांना चकमा देऊन प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे पाण्याच्या टाकीवर चढण्यात यशस्वी झाला. सकाळी फिरायला जाण्याला लोकांना तो टाकीवर चढलेला दिसला. गावातील लोकांना माहिती मिळताच याठिकाणी गर्दी जमली होती. त्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यामुळे लगेच पोलिसांना टाकीसभोवताल बंदोबस्त लावावा लागला. त्याला गावातील नागरिकांसोबतच पोलासांनीसुद्धा समज देऊन टाकीवरुन खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, कारवाई करत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत उतरणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्याने घेतली होती. 

हेही वाचा - मुलीची काळजी असणाऱ्या कुटुंबात तुझा पुनर्जन्म व्हावा, गौतम यांचा आमटे कुटुंबीयांवर अप्रत्यक्ष...

शेवटी पंचायत समीतीतील वंजारी यांनी  चौकशी करण्याचे लिखित आश्वासन दिल्यानंतर तो जवळपास १० ते ११ वाजण्याच्या सुमारास खाली उतरला. तो जवळपास ५ ते६ तास पाण्याच्या टाकीवर असल्याने या वेळात मात्र प्रशासनाला व पोलिस विभागाला मोठी कसरत करावी लागली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man agitated by climbing on water tank in mohadi of bhandara