खाकीच्या आड तो करत होता तोतयागिरी.. अखेर या दबंग ठाणेदाराने केली धडक कारवाई..वाचा काय आहे प्रकार  

विवेक राऊत 
Thursday, 13 August 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 11) सायंकाळी 5 वाजता अमरावतीचे संजय श्रीखंडे हे त्यांच्या दोन मित्रांसह मालखेड तलावाच्या कॅनलवर जेवण करीत होते. त्यावेळी शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत व फ्रेजरपुराहद्दीत सीआर व्हॅनवर कार्यरत अमित धनकर (वय 30) व खासगी व्यक्ती अजय तायडे हे दोघे तेथे आले.

चांदूर रेल्वे (जि. अमरावती) :  पोलिसांच्या सी.आर.व्हॅनचा एक कर्मचारी चांदूर रेल्वे तालुक्‍यात येऊन काही लोकांना धमकावून जबरी वसुली करीत होता. ही माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांना मिळताच त्यांनी सापळा रचून त्या कर्मचाऱ्याला अटक केली. त्याच्या विरुद्ध लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 11) सायंकाळी 5 वाजता अमरावतीचे संजय श्रीखंडे हे त्यांच्या दोन मित्रांसह मालखेड तलावाच्या कॅनलवर जेवण करीत होते. त्यावेळी शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत व फ्रेजरपुराहद्दीत सीआर व्हॅनवर कार्यरत अमित धनकर (वय 30) व खासगी व्यक्ती अजय तायडे हे दोघे तेथे आले. अमित धनकर हा पोलिस गणवेशात होता. जेवण करणाऱ्यांजवळ हे दोघे गेल्यानंतर "तुम्ही दारू पित आहात, तुमच्यावर कारवाई करतो व तुम्ही माझ्यासोबत चला" असे म्हटले. त्यामुळे जेवण करणारे तिघेही घाबरले. नंतर त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून कारवाई करण्याचा धाक दाखवून 3 हजार रूपये जबरीने घेतले व तेथुन ते मोटारसायकलने निघुन गेले. फिर्यादी फार घाबरल्याने ते पोलिस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेले नाहीत. 

अधिक वाचा - राजकारण : शिवसेनेत काँग्रेसी कल्चरचा शिरकाव; निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता, वाचा...

पाळत ठेऊन केली अटक 

ही घटना ठाणेदार दीपक वानखडे यांना माहिती पडली. त्यामुळे बुधवारी ठाणेदारांनी पोलिस स्टॉफसह सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान त्याचठिकाणी पाळत ठेवली. तेवढ्यात तो पोलिस शिपाई व एक खासगी इसम पुन्हा मालखेड तलाव परिसरात आले. तेथे प्रल्हाद सोनोने नामक व्यक्ती जेवण करीत असतांना त्या ठिकाणी संबंधित शिपाई व इसम झटापट करीत होते व त्यांच्याकडून पैसे घेत होते. तेव्हा पाळत ठेवलेल्या ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी दोघांना पकडले. त्यांची चौकशी केली असता मंगळवारी घडलेल्या घटनेचीही कबूली त्यांनी दिल्याचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी सांगितले.

सदर घटना संजय श्रीखंडे यांना माहित पडल्याने त्यांनी पोलिस स्टेशनला येऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून अमित धनकर व अजय तायडे याच्यांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात चंद्रशेखर पाठक, शेख गणी, श्री. गिरी, अमर काळे यांनी केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अमीत धनकर (ब.न. 1862) याच्यावर गुरुवारी (ता. 13) पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांनी निलंबनाची कारवाई केली.

हेही वाचा - सावधान! पुढील दोन दिवसांत या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

अशा घटना घडल्यास कळवा

चांदूर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीत कुठल्याही पोलिस कर्मचाऱ्यांकडून अशा पैसे वसुलीच्या घटना घडल्या तर नागरिकांनी भीती न बाळगता प्रत्यक्ष मला किंवा पोलिस स्टेशनला येऊन कळवावे. असे आवाहन ठाणेदार दीपक वानखडे यांनी केले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man demanding money from people as police officer