
दर्यापूर(जि. अमरावती): कोरोनाच्या संकटकाळात सर्व पारंपरिक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यात लॉकडाउनमध्ये कारागिरांच्या हाताला काम मिळत नाहीये अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. मात्र काही तरुण या सर्व संकटांमधून मार्ग काढून काहीतरी अनोखे कार्य करत आहेत.
नरेश पुनकर यांचा पारंपरिक व्यवसाय सुतारकाम आहे. कुशल कारागीर असल्याने लाकडाच्या वस्तू, फर्निचर तयार करण्यासाठी त्यांना गावोगावी बोलावल्या जायचे, मात्र अचानक लॉकडाउन सुरू झाल्याने हातातील सर्व कामच बंद झाले. अशावेळी निर्माण झालेल्या समस्येला संधीत रूपांतरित करून नरेश पुनकर यांनी कौतुकास्पद काम करून दाखवले आहे.
आजच्या नवतंत्रज्ञानाच्या युगात लोकांना पारंपरिक वस्तूंचा विसर पडत आहे. तसेच शहरात शिकणाऱ्या नवीन पिढीला या शेतीविषयक अवजारांचा विसर पडू नये आणि त्या पाहून कोणत्या वस्तूचा शेतात कसा वापर होतो, या सामाजिक हेतूने वस्तू तयार करण्यात आल्या आहेत.
लाकडापासून निर्मित बैलगाडी, तिफण, दमनी, शंकरपटातील रेंगी, पेरणी हल, वखर, उवर, दताया, फावळ, कुदळ, पुराणी, जुआळी, विळा, पारंपरिक कंदील अशा सर्व शेती अवजारांसह विविध 40 प्रकारच्या पारंपरिक वस्तू हुबेहूब तयार केल्या आहेत. लॉकडाउन काळात शाळांना सुट्या असल्याने गावातील बच्चे कंपनी मोठ्या कुतूहलाने ही अवजारे पाहण्यासाठी येत आहेत.
नरेश यांनी या पारंपरिक वस्तू तयार करण्याचा निश्चय केला आणि बघता बघता छोट्या स्वरूपातील सुंदर पारंपरिक वस्तू त्यांनी 50 दिवसांत तयार केल्या. या वस्तू दिसायला अत्यंत सुंदर असून हुबेहूब शेतीतील अवजारांची प्रतिकृती साकारल्या असल्याने घरात शोभेची वस्तू म्हणून ठेवण्यासाठी याला मागणी वाढली आहे.
या कामात मिळतो आनंद
मला अशा वस्तू बनविण्याची पूर्वीपासून आवड तर आहेच, पण नेहमी कामाच्या व्यस्ततेत त्या बनवू शकलो नाही. परंतु लॉकडाउनमध्ये मी पारंपरिक पद्धतीची शेतीत वापरणारी 40 अवजारे बनविली. ही अवजारे जेव्हा चिमुकले कुतूहलाने पाहतात व त्याविषयी विचारणा करतात, तेव्हा केलेल्या कामाचा सुखद आनंद मिळतो.
-नरेश पुनकर,
सुतार कारागीर.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.