तरुणाने शोधला प्लस्टिकला पर्याय; बांबूपासून तयार केल्या वस्तू; देशभरातून मोठी मागणी 

Man made things using bamboo instead of plastic
Man made things using bamboo instead of plastic

गडचिरोली : नक्षली सावटाखाली जीवन जगत असलेल्या आदिवासींना सरकारकडून अपेक्षा नाहीच. किंबहुना सरकारने आमच्यासाठी काही करावे, असे त्यांचे म्हणणे नाही. कारण पिढ्यानपिढ्यांपासून केवळ उदरनिर्वाहासाठी जगणाऱ्या या समाजाच्या गरजाच सीमित आहेत. परंतु निसर्गाचा पूजक असलेल्या या समाजाचा उद्धारकही निसर्गच आहे, ही बाब एका तरुणाच्या लक्षात आली आणि तिथूनच सुरु झाली बांबूकला.

गडचिरोली जिल्ह्यात विपूल नैसर्गिक संपन्नता आहे. आयुर्वेदिक वनौषधींची खाण समजल्या जाणाऱ्या या भागात बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बांबू उत्पादनाच्या माध्यमातून येथील आदिवासींना रोजगार मिळावा, चांगल्या अर्थार्जनातून ते स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी एका तरुणाची सतत धडपड सुरू आहे.

त्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही आले, तरीही त्याचे प्रयत्न थांबले नाहीत. आज गडचिरोली जिल्ह्यात तयार झालेल्या बांबूच्या वस्तूंना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध भागांतून मोठी मागणी आहे. हाताला काम मिळाल्याने तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. बांबूपासून वस्तूनिर्मितीचे हब म्हणून या भागाला प्रसिध्दी मिळत आहे. याचे श्रेय आदिवासींच्या मेहनतीला असले तरी त्यांना हा मार्ग दाखविणाऱ्या निरंजन तोरडमलचाही यात खारीचा वाटा आहे.

बांबू हस्तकला प्लास्टिकला पर्याय ठरू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्मित बांबूवर प्रक्रिया करून त्यापासून निर्मित वस्तू बाजारात आणल्या तर रोजगारासोबत अर्थार्जन असे दोन्ही हेतू साध्य होऊ शकतात, हा विचार त्याच्या डोक्यात आला. बांबूपासून बनलेले ट्रे, खुर्च्या, पलंग आदी वस्तूंचे डिझाईन त्याने स्वतः तयार केले. पुण्याच्या एमआयटी या नामांकित महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी मिळविलेल्या निरंजनचे ध्येय काही वेगळेच होते. त्यातच निर्माणशी जुळल्याने आपल्याला मनासारखे काही करता येईल, हे निरंजनला उमगले.

सरकारने प्लास्टिकवर बंदी आणल्याने वस्तू, खाद्यपदार्थांचे वहन करण्यासाठी काहीतरी लागेल, या विचारातून बांबूच्या उपयोगातून काहीतरी करण्याचा विचार निरंजनच्या मनात आला. गडचिरोली विद्यापीठाअंतर्गत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची स्थापन करण्यात आली. याअंतर्गतच निरंजनने आपले काम सुरू केले. 

स्वतःमधील अभियांत्रिकी कौशल्याच्या आधारे गावातील नागरिकांना त्याने बांबुपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणे सुरू केले. अतिशय कमी काळात नागरिक या कामात प्रवीण झाले. त्यानंतर लगेच प्रत्यक्षात काम सुरू करण्यात आले. बांबूपासून आकर्षक वस्तू तयार करण्यासोबतच विविध प्रकारच्या राख्याही मोठ्या प्रमाणात साकारण्यात आल्या. विशेष म्हणजे या साऱ्या वस्तूंना चांगली मागणीही आहे.

मेघालय सरकारकडून कौतुक

याशिवाय शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे बांबू टोकन यंत्र तयार करण्यात आले. हे शेतकऱ्यांना सगुणा धान लागवड तंत्रज्ञानच्या कार्यपद्धतीत विहित अंतरावर बियाणे पेरणी आणि वाफे तयार प्रक्रियेत मदत करीत आहे. विशेष म्हणजे मेघालय राज्य विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेने एसटीआरसी विकसित बांबू टोकन यंत्राच्या संशोधन व विकासात सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोजच्या वापरातील उपयुक्त वस्तू, सुशोभीकरणाच्या वस्तू, शेतीसंबंधित अवजारे, हंगामी मागणीच्या वस्तू यांचे मागणीनुसार उत्पादन करणे हे या केंद्राचे मुख्य लक्ष्य असेल.

बांबू-गोटूल कोंदावाही या नावाने सुसज्ज बांबू कार्यशाळेचे आयोजन केले जाते. स्थानिक कारागिरांना बांबू हस्तकलेत शाश्वत व्यवसाय विकसित करण्यात प्रोत्सानह देणे हे याचे उद्दिष्ट आहे. बांबूपासून तयार करण्यात येणारे शेड बनविण्यावर निरंजनने अभ्यास केला असून लोखंडी शेडच्या तोडीचे बांबू शेड असल्याचा त्याचा दावा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com