महिलेला अ‌ॅसिड फेकून ठार मारण्याची धमकी, अत्याचार केल्याचाही आरोप

संतोष ताकपिरे
Saturday, 5 December 2020

दोन वर्षांपूर्वी पीडित महिलेचा घटस्फोट झाला. तीन अपत्यांसह नातेवाइकांच्या मदतीने ती राहत असताना, तिची ओळख संशयित आरोपी राजू ज्ञानेश्वर देशभ्रतार (वय 35, रा. बडनेरा) सोबत झाली. राजूने त्या महिलेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला असता तिने लग्नास नकार दिला.

अमरावती : तीन अपत्य असलेल्या महिलेने घटस्फोट घेतल्यानंतर नातेवाइकांच्या मदतीने राहत असल्याचे बघून, संशयित आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. त्याने अ‌ॅसिड फेकून महिलेसह तिच्या दोन्ही मुलींना मारण्याची धमकी दिली, असा आरोप महिलेने केला आहे.

हेही वाचा -आला रे आला बिबट्या आला; तीन दिवसांपासून कार्ला शिवारात शेतमजुरांत भीतीचे वातावरण

वलगाव ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. दोन वर्षांपूर्वी पीडित महिलेचा घटस्फोट झाला. तीन अपत्यांसह नातेवाइकांच्या मदतीने ती राहत असताना, तिची ओळख संशयित आरोपी राजू ज्ञानेश्वर देशभ्रतार (वय 35, रा. बडनेरा) सोबत झाली. राजूने त्या महिलेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला असता तिने लग्नास नकार दिला. सतत मागे लागत असल्याने पीडिता तीनही अपत्यांसह माहेरी राहायला गेली. राजूने तिचे माहेर गाठून अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला. याच दरम्यान पीडितेला लग्नासाठी स्थळ येत होते. त्यामुळे बदनामी होईल या भीतीने तिने घटनेची वाच्यता केली नाही. घटनेच्या दिवशी पीडिता बाहेर गेली असताना, संशयित आरोपीने तिच्या खोलीवर जाऊन घरातील सामान फेकून नुकसान केले. पीडितेला त्याने घरातील सामुग्री जाळण्याचीही धमकी दिली होती, असा आरोप पीडितेने केला. प्रकरणी वलगाव पोलिसांनी संशयित राजू देशभ्रतारविरुद्ध अत्याचार, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

हेही वाचा - विवाह सोहळा बनलाय वन-डे मॅच, मुंडावळ्यांऐवजी देखण्या मास्कचा साज

वलगाव ठाण्याच्या हद्दीत आणखी एक अत्याचाराची घटना घडली. पीडित महिलेच्या घरी कुणी नसताना, संशयित आरोपी राहुल विलास इंगळे (वय 30) याने घरात घुसून पीडितेला शारीरिक सुखाची मागणी केली. पीडितेने नकार दिला असता, त्याने वाद घालून बळजबरीने अत्याचार केला. पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता, तिला मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी संशयित राहुलविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

हेही वाचा - बापरे! दोन महिन्यांपासून निर्ली गावचे गावकरी भटकताहेत पाण्यासाठी, प्रशासनाने करावी उपाययोजना

अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार -
ग्रामीण भागात बेनोडा ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीचे संशयित आरोपी आकाश कुमरे (वय 24) याने फोन करून भेटीसाठी बोलावून अपहरण केले. नागपुरात नेऊन बळजबरीने अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी संशयित आकाशविरुद्ध गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man threatens to woman to killed in amravati