
सध्या असलेल्या नियम व अटींमुळे यानिमित्ताने शाही विवाह सोहळे लुप्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मुंडावळ्यापेक्षा चांगल्या आणि देखण्या मास्कचा नवरदेव आणि नवरीला साज चढू लागलाय.
वर्धा : एकेकाळी लग्नसराई म्हटले की बाजारात धावपळ, वर्दळ आणि सर्वत्र फक्त गर्दीचा माहोल. लग्न हा इतका धांदलीचा आणि आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असायचा की घाईच्या कोणत्याही गोष्टीला लगीनघाईची उपमा दिली जायची. मात्र, कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम आल्याने लग्नातील वऱ्हाडी मंडळीची संख्या मर्यादित झाली. त्यामुळे सहाजिकच मंगल कार्य ठरलेल्या लग्नसोहळ्याचे पूर्ण स्वरूपच बदलून गेले आहे.
हेही वाचा - अमरावतीतील मृत्यूप्रकरणाला वेगळे वळण; संशयाच्या आधारे बाळाच्या आईला अटक
सध्या असलेल्या नियम व अटींमुळे यानिमित्ताने शाही विवाह सोहळे लुप्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मुंडावळ्यापेक्षा चांगल्या आणि देखण्या मास्कचा नवरदेव आणि नवरीला साज चढू लागलाय. मेट्रो सीटीमध्ये तर मास्क देखील चांदी आणि सोन्याच्या डिझाईन वर्क केलेले मिळू लागले आहेत, तर एकेकाळी होणाऱ्या शाही विवाह सोहळ्यांना आता चांगलीच मर्यादा आली. कित्येक एकर क्षेत्रावर भव्य शामियाने उभारून पार पडणारे शाही विवाह सोहळे आता आपापल्या बंगल्याचे आवारात पार पडू लागले आहेत.
हेही वाचा - मुख्यमंत्री देतील का `प्रश्नचिन्ह`ला उत्तर?
एखाद्याची श्रीमंती मोजायची झाली तर त्याच्या मुलाच्या अथवा मुलीच्या विवाह सोहळ्यात मोजली जायची. ती पद्धतच आता बदलून गेली आहे. कोणाचा विवाह कधी आणि कोठे पार पडला? हे आता ग्रामदेवतेच्या दर्शनाला वधू-वर आल्यावरच समजू लागले आहे. पन्नासपेक्षा जास्त उपस्थितीला मर्यादा आल्याने मुलीकडचे आणि मुलाकडचे मोजकेच लोक एकत्र येऊन असे विवाह आपल्या घरासमोर अथवा मंगल कार्यालयाच्या आतमध्ये शासकीय नियमांचे पालन करून उरकत आहेत.
हेही वाचा - महेंद्री अभयारण्याला स्थानिकांचा विरोध; वन्यजीव...
नियम अटीत वधूपित्यांना मिळतोय दिलासा -
प्रशासनाने विवाहाच्या नावाखाली खर्च कमी करा, असे सामाजिक कार्यकर्त्यांनी कितीही आवाहन केले तरी समाजातील विवाह सोहळ्यातील उधळपट्टीच्या आणि अनावश्यक खर्चाच्या चालीरीती बंद होत नव्हत्या. आता मात्र या कोरोनाने सर्वांनाच लग्नसमारंभाच्या शिस्तीचा अनोखा मापदंड आपोआप घालून दिला आहे. प्रशासनाच्या कारवाई निमित्ताने का होईना मात्र जिवाचे भीतीने रिकामटेकडे वऱ्हाडी आणखीन कामाचे गावकरी दिवसभर मंडपात गर्दी करायचे बंद झाले आहेत. शिवाय ऋण काढून लग्न, सण साजरा करण्याची पद्धत आणि एका दिवसाच्या लग्न सोहळ्यासाठी आयुष्य भर कर्जबाजारी होणारे वधूवर पिता आता आयुष्यातील महत्त्वाचे कर्तव्य पार पाडताना आनंददायी दिसत आहेत.
हेही वाचा - गावांत वाढली भांडणे; तंटामुक्त समित्या कागदावरच!
विवाह सोहळा झाला वनडे मॅचसारखा -
एकेकाळी मेहंदी, हळद, लग्न आणि इतर कार्यक्रम, असा चार ते पाच दिवसांचा भव्य कार्यक्रम असायचा. आता मात्र सकाळी साखरपुडा, दहा वाजता हळद आणि त्याच दिवशी दुपारी लग्न आणि रिसेप्शनचे जेवण, असा वन डे मॅचसारखा कार्यक्रम उरकला जात आहे.