"क्‍लीन एनर्जी'साठी जागतिकस्तरावर मनपाचेही योगदान

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टाळण्यासाठी जागतिकस्तरावर "क्‍लीन एनर्जी'च्या निर्मितीसाठी संशोधन केले जात असून उपाययोजना केल्या जात आहेत. यात महापालिकेचेही योगदान असून नुकताच "द न्यूयॉर्क टाइम्स'ने यावर महापौर नंदा जिचकार यांची मुलाखत प्रसिद्ध करीत शहरातील क्‍लीन एनर्जीची दखल घेतली.
"जगभरातील बदलते वातावरण, त्याचे परिणाम आणि उपाय' यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शहरांतील महापौरांचा समावेश असलेली ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्स, अशी चळवळ सुरू केली आहे. या माध्यमातून परिणामांवर चर्चा आणि उपायांचा आराखडा तयार केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या या चळवळीबाबत "द न्यूयॉर्क टाइम्स'ने जगातील विविध शहरांच्या महापौरांच्या मुलाखती घेतल्या. यात महापौर नंदा जिचकार यांचाही समावेश आहे. सन 2040 मध्ये ग्लोबल वॉर्मिंग 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. ही भीती लक्षात घेता, अनेक राष्ट्रांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असून, ग्लोबल वॉर्मिंगची भयावहता टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. जगातील 24 देश आणि युरोपीयन युनियनने एकत्र येऊन "क्‍लीन एनर्जी'ला प्रोत्साहन देण्यासाठी "मिशन इनोव्हेशन' उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये नुकतेच ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर चळवळीतील विविध शहरांचे महापौर भागीदार झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समूहाने एकत्र येऊन एखाद्या जागतिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची ही पहिलीचे वेळ असल्याचे "द न्यूयॉर्क टाइम्स'ने विशेषत्वाने नमूद केले आहे. नागपूर शहरात बदलत्या वातावरणाचे परिणाम टाळण्यासाठी काय उपाययोजना सुरू आहेत, यावर नंदा जिचकार यांची मुलाखत घेऊन प्रकाशित केली. नागपूर शहराने पारंपरिक वीज दिवे एलईडीमध्ये परावर्तीत करीत ऊर्जा बचतीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सुमारे एक लाख 10 हजार पथदिवे एलईडीमध्ये परावर्तीत करीत 40 टक्के ऊर्जेची बचत सुरू केली आहे. कमी ऊर्जा बिलांमधून उत्पन्न झालेल्या बचतीद्वारे अर्थसाहाय्य केले जात असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी मुलाखतीत सांगितले. स्वच्छ ऊर्जा आणि तंत्रज्ञानातील संशोधनातून विकास करण्याकरिता वाढलेली गुंतवणूक शहरांना अधिक शाश्वत बनवू शकेल, असेही त्या मुलाखतीदरम्यान बोलल्या.
पर्यावरणाच्या आव्हानावर स्मार्ट सिटीचा उतारा
2050 पर्यंत भारताच्या शहरी लोकसंख्येमध्ये 400 दशलक्ष वाढ होण्याची शक्‍यता आहे. अशा जलद शहरीकरणामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या मोठा ताण निर्माण होतो. या आव्हानांना तोंड देण्यासाठी नागपूरने स्मार्ट सिटीमध्ये गुंतवणूक केल्याचे महापौरांनी मुलाखतीत नमूद केले. नागपूर भारतातील प्रथम क्रमांकाचे स्मार्ट शहर आहे. स्मार्ट सिटी अभियान स्वाभाविकपणे हवामान बदलाच्या विरुद्ध लढ्याशी जोडलेले असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com