तर शिरीष वायूसेनेत नसता - मंदा देव

निखिल भुते
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नागपूर - वडील मृत्यूशय्येवर असल्याचे कळल्यानंतर मिनूने (शिरीष देव) वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या हवाईदलाच्या प्रशिक्षणातून परतण्याचा विचार केला होता. त्यावेळी ‘तू परत आलास तर वडिलांना वाईट वाटेल. तुझा त्यांना अभिमान वाटावा असे काम कर’ या शब्दांनी शिरीष थांबला आणि आज तो हवाईदलाच्या उपप्रमुखपदी पोहचल्याची आठवण, आई मंदा देव यांनी ‘सकाळ’शी केलेल्या विशेष बातचीतमध्ये सांगितली. 

नागपूर - वडील मृत्यूशय्येवर असल्याचे कळल्यानंतर मिनूने (शिरीष देव) वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या हवाईदलाच्या प्रशिक्षणातून परतण्याचा विचार केला होता. त्यावेळी ‘तू परत आलास तर वडिलांना वाईट वाटेल. तुझा त्यांना अभिमान वाटावा असे काम कर’ या शब्दांनी शिरीष थांबला आणि आज तो हवाईदलाच्या उपप्रमुखपदी पोहचल्याची आठवण, आई मंदा देव यांनी ‘सकाळ’शी केलेल्या विशेष बातचीतमध्ये सांगितली. 

एक मुलगा हवाईदलाचा उपप्रमुख तर दुसरा राज्याचा महाधिवक्ता. आपल्या मुलांच्या कर्तृत्वाचा झेंडा त्रिलोकी फडकावा, अशी इच्छा प्रत्येकच आईची असते. मंदा देवदेखील याला अपवाद नाहीत. एकापाठोपाठ दोन दिवसांच्या आत कळलेल्या आनंदी घटना देव कुटुंबीयांसाठी ‘डबल बोनान्झा’ आहेत. दोन्ही मुलांच्या प्रगतीचा आनंद असल्याचे सांगत दोघेही एक ना एक दिवस आपापल्या क्षेत्रात नाव कमावतील याचा पूर्ण विश्‍वास असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी शिरीष आणि रोहित देव यांच्या बालपणीचे विविध किस्से उलगडले. वेग आणि धाडसी कृत्यांची आवड असलेला शिरीषला दहावीत असताना कार चालवायला शिकायचे होता. परवाना नसताना कार चालविल्यामुळे दोन वेळा त्याला पोलिसांनी चालानदेखील केले होते. तर अगदी या उलट रोहित होता. काहीसा अबोल असलेल्या रोहितला बुद्धिबळाची प्रचंड आवड असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

‘एअर पॉवर’ ते ‘एरोस्पेस पॉवर’
पठाणकोट ‘एअरफोर्स बेस’वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी एअर मार्शल शिरीष देव हे तेथेच उपस्थित होते. त्यांनी सैन्य, एनएसजी व स्थानिक सुरक्षा यंत्रणांसोबत समन्वय साधला होता. माहितीचे आदानप्रदान आणि प्रत्यक्ष ‘ऑपरेशन’च्या वेळी त्यांच्या समन्वयाचा मौलिक फायदा झाला. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या देव यांचे लिखाणदेखील उत्तम आहे. ‘एअर पॉवर’ ते ‘एरोस्पेस पॉवर’ हा भारताचा प्रवास त्यांनी अनुभवला आहे.
 

थोरला ‘ऑर्गनाईज’, धाकटा वेंधळा
थोरला मुलगा शिरीष हा सुरुवातीपासूनच ‘ऑर्गनाईज’ होता. यामुळे त्याने आठवीत असतानाच हवाईदलामध्ये जाण्याचे निश्‍चित केले होते. तर रोहित कायम वेंधळा असल्याचे सांगत अकरावीत विज्ञान, बारावीत कला आणि पुढे जाऊन वाणिज्य शाखेमध्ये त्याने प्रवेश केला. मात्र, दोघांमध्येही वाचन आणि विनम्रता हा समान दुवा असल्याचे मंदा देव सांगतात. दोन्ही मुलांनी कधीही पैशाला सर्वोच्च महत्त्व दिले नाही. दोघेही प्रसिद्धीपरांगमुख असून कधीही कौतुकाने हुरळून जात नसल्याचे त्या म्हणाल्या. 

Web Title: manda deo discussion with sakal