
जांभळी, मुरदोली, झुरकुटोला, कलपाथरी, तिल्ली, मोहगाव, दोडके, बागळबंद ही गावे जंगलव्याप्त भागांत येतात. जंगलात पर्याप्त सोयी नसल्याने वन्यप्राणी जंगलातून गावाच्या दिशेने कूच करू लागले आहेत
गोंदिया ः गोरेगाव वनपरिक्षेत्रात एकापाठोपाठ सलग दोन दिवस दोन बिबट्यांचा मृतदेह आढळल्याने वनविभागासमोर मृत्यूचे कारण शोधण्याचे मोठे आव्हान आहे. शिवाय या घटनेने वन्यजीवांच्या संरक्षणाचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. या वनपरिक्षेत्रातील बहुतेक गावे जंगलाला लागून असून, शिकाऱ्यांची टोळी सक्रिय झाली आहे. हे यापूर्वीच्या घटनांवरून स्पष्ट होते. 31 डिसेंबर या दिवशी शिकाऱ्यांनी शिकार केली असावी, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
जांभळी, मुरदोली, झुरकुटोला, कलपाथरी, तिल्ली, मोहगाव, दोडके, बागळबंद ही गावे जंगलव्याप्त भागांत येतात. जंगलात पर्याप्त सोयी नसल्याने वन्यप्राणी जंगलातून गावाच्या दिशेने कूच करू लागले आहेत. सिमेंटीकरणामुळेही हे घडत आहे. त्यामुळे अनेकांची नजर वन्यप्राण्यांवर जाऊ लागली आणि गावागावांत शिकाऱ्यांची टोळी सक्रिय होऊ लागली.
या टोळीने परजिल्हा आणि परराज्यातील टोळीला हाताशी घेत आपला जम अधिक घट्ट केल्याची चर्चा आहे. 31 डिसेंबरच्या रात्रीला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ओल्या पार्ट्या या वनपरिक्षेत्राच्या हद्दीत झाल्याचे बोलले जात आहे. या पार्ट्यांतील शिकाऱ्यांनी वन्यजीवांना लक्ष्य केले असावे, असाही एक अंदाज बांधला जात आहे.
3 जानेवारीला सकाळी इंदिरानगर, तिल्ली मोहगाव येथील देवचंद सोनवाने यांच्या मालकीच्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळला. वनविभाग आणि वन्यजीवप्रेमींनी बिबट्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला असता, बिबट्याच्या समोरील पायाचे दोन्ही पंजे गायब असल्याचे दिसले. याच परिसरात पाहणी केल्यानंतर एका निलगायीचे डोके व पाय कुजलेल्या अवस्थेत वेगवेगळ्या जागेवर आढळून आले.
या घटनेची शाई वाळते न वाळते तोच 4 जानेवारीला मृत बिबट्या आढळल्याच्या स्थळापासून 50 मीटर अंतरावर दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह आढळला. या बिबट्याचे डोके व समोरचे दोन पंजे गायब असल्याचे वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिसले. या संपूर्ण घटनाक्रमावरून बिबट्यांची शिकार झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. किंबहुना तशी चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वीच बागळबंद येथे रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी पोलिस पाटलाला अटक करण्यात आली होती. बिबट्यांच्या मृत्यूमुळे या परिसरात मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे तितकेच खरे आहे.
संपादन - अथर्व महांकाळ